नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 18:27 IST2021-12-11T18:26:01+5:302021-12-11T18:27:06+5:30
नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्याचे भासवून येथे राज्य नाट्य स्पर्धा घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला मिरजेतील नाट्यकर्मी, रसिकांनी विरोध केला आहे.

नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा
मिरज : मिरजेची सांस्कृतिक ओळख असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी तब्बल एक कोटी खर्च झाले आहेत. मात्र नाट्यगृहात ध्वनी यंत्रणा व विद्युत यंत्रणेचे कामे अपूर्णच आहे. नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्याचे भासवून येथे राज्य नाट्य स्पर्धा घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला मिरजेतील नाट्यकर्मी, रसिकांनी विरोध केला आहे. ध्वनी व विद्युत यंत्रणेचे काम पूर्ण करण्याची मागणी शहरातील नाट्यसंस्था व रंगकर्मींनी केली आहे.
नाट्यगृहात दर्जेदार ध्वनी व विद्युत यंत्रणा आवश्यक आहे. मिरजेत महापालिकेने साडेसात कोटी रुपये खर्चून बालगंधर्व नाट्यगृह बांधले आहे. मात्र कोट्यवधी खर्चून बांधलेल्या नाट्यगृहात अनेक उणिवा आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याने नाट्यगृहाच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. महापालिकेसाठी हे नाट्यगृह पांढरा हत्ती ठरले आहे. वापराअभावी ते भंगाराचे गोदाम बनले आहे. महापालिकेच्या कचरा गाड्या, घंटागाड्या, रेकॉर्ड, रद्दी व मोडके फर्निचर तळघरात ठेवण्यात येत आहे. मोकळ्या खोल्या महापालिकेचा विद्युत विभाग व मालमत्ता विभागाच्या ताब्यात आहेत.
बालगंधर्व नाट्यगृहाच्या या उपेक्षेमुळे नाट्यकर्मींत अस्वस्थता आहे. त्याच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले. नूतनीकरणाचे रखडलेले काम दोन वर्षानंतर पूर्ण झाले. नाट्यगृहात खुर्च्यांची दुरुस्ती, कार्पेट, छताची गळती काढणे, रंगरंगोटी करणे, पडदे व्यवस्था दुरुस्ती, कुंपणभिंत रंगवणे, कुंपण दुरुस्ती अशा कामांवर एक कोटी रुपये खर्च झाले. नाट्यगृहाच्या ध्वनी व विद्युत यंत्रणेच्या कामासाठी आता निधीच शिल्लक नसल्याचा ठेकेदाराचा पवित्रा आहे. सुविधांचा अभाव असतानाही काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नूतनीकरणाच्या कामात घोटाळा झाल्याची नाट्यकर्मींची तक्रार आहे. ध्वनी व विद्युत यंत्रणेचे काम पूर्ण झाल्याशिवाय नाट्यगृह सुरू करू नये अशी त्यांची मागणी आहे.
रंगकर्मीसोबत चर्चा न करताच निर्णय
महापालिकेचे अधिकारी झालेले काम योग्य असल्याचे सांगत ठेकेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी लोकांची तक्रार आहे. ध्वनी व विद्युत यंत्रणा नसतानाही बालगंधर्व नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धा घेण्यास नाट्यकर्मींनी विरोध दर्शविला आहे. सांगली-मिरजेतील रंगकर्मींसोबत चर्चा न करता राज्य नाट्य स्पर्धा मिरजेत बालगंधर्वमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काम अपूर्ण असताना नाट्यगृहात राज्य नाट्य स्पर्धा घेतल्यास आंदोलनाचा इशारा काही रंगकर्मींनी दिला आहे.