मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्यास अटक, शुभेच्छा फलकावर झळकले होते छायाचित्र
By श्रीनिवास नागे | Updated: April 5, 2023 17:41 IST2023-04-05T17:40:40+5:302023-04-05T17:41:44+5:30
हद्दपार झाला तरी अमोल शहरात बिनधास्त वावरत हाेता

मिरजेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या हद्दपार कार्यकर्त्यास अटक, शुभेच्छा फलकावर झळकले होते छायाचित्र
मिरज : मिरजेतशिवसेना शिंदे गटाचा हद्दपार झालेला कार्यकर्ता अमोल दुर्गाप्पा रणधीर (वय ३४, रा. इंदिरानगर, मिरज) यास हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात फिरताना शहर पोलिसांनी अटक केली. रणधीर याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेतील शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असलेल्या अमोल रणधीर याच्यावर इंदिरानगर परिसरात अवैध दारू विक्री, मारामारी आदी गुन्हे दाखल आहेत. शहर पोलिसांच्या प्रस्तावावर प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी अमोल रणधीर याच्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश पोलिसांना दिला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या शुभेच्छा फलकावर हद्दपार अमोल रणधीर याचे छायाचित्र झळकले होते.
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे फलकावरील रणधीर याचे छायाचित्र हटविण्यात आले. हद्दपार झाला तरी अमोल शहरात बिनधास्त वावरत हाेता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी दर्गा चाैक परिसरात फिरत असताना अमोल रणधीर यास अटक केली. रणधीर याच्याविरुद्ध हद्दपार आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.