lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > नोकरीवाली सासुबाई म्हणून सुखानं नोकरी करते सूनबाई! घर घर की कहानी खरंच अशी बदलतेय?

नोकरीवाली सासुबाई म्हणून सुखानं नोकरी करते सूनबाई! घर घर की कहानी खरंच अशी बदलतेय?

नोकरी करणारी सासू हवी, अशी मागणी उपवर मुलींनी केली तर नवल नाही, नोकरदार सासुबाई सुनेला अधिक समजून घेते, असे अभ्यास सांगतात! लग्न ठरण्याच्या वयातल्या, उत्तम शिकलेल्या बहुतेक सगळ्या भारतीय मुलींच्या मनात एकच प्रश्न असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 04:55 PM2023-09-26T16:55:08+5:302023-09-26T16:57:50+5:30

नोकरी करणारी सासू हवी, अशी मागणी उपवर मुलींनी केली तर नवल नाही, नोकरदार सासुबाई सुनेला अधिक समजून घेते, असे अभ्यास सांगतात! लग्न ठरण्याच्या वयातल्या, उत्तम शिकलेल्या बहुतेक सगळ्या भारतीय मुलींच्या मनात एकच प्रश्न असतो.

working mother in law help daughter in law to work, build career, research says.. | नोकरीवाली सासुबाई म्हणून सुखानं नोकरी करते सूनबाई! घर घर की कहानी खरंच अशी बदलतेय?

नोकरीवाली सासुबाई म्हणून सुखानं नोकरी करते सूनबाई! घर घर की कहानी खरंच अशी बदलतेय?

Highlightsमुलाची आई नोकरी करणारी असावी’

गौरी पटवर्धन

प्रश्न कसला, धाकधूकच असते. “लग्न झाल्यानंतर सासरचे नोकरी करू देतील का?”
शिकलेल्या मुलींच्या दृष्टीने हा प्रश्न फार फार महत्वाचा असतो. पण, प्रत्यक्ष ती मुलगी सोडली तर इतर कोणालाही तो मुद्दा महत्त्वाचा वाटताना दिसत नाही. खरं म्हणजे आई - वडिलांनी पोटाला चिमटे काढून लेकीच्या शिक्षणावरही पैसे खर्च केलेले असतात. क्वचित कधी तरी कर्ज काढलेलं असतं. मुलीची शाळा आणि कॉलेजची वेळ, तिचा अभ्यास, डबा, क्लास, जाण्या-येण्याची सोय यासाठी संपूर्ण घरादाराने कष्ट घेतलेले असते. तडजोडी केलेल्या असतात. मात्र, याच मुलीला त्याच शिक्षणाचा उपयोग करून लग्नानंतर करता येईल का, हा प्रश्न त्यांच्याही दृष्टीने विशेष महत्त्वाचा नसतो. अनेक घरातून तर असंही बघायला मिळतं, की मुलीची हौस, हट्ट, जिद्द असल्यामुळे तिला घरातून शिक्षण घेण्याची परवानगी मिळते. ही परवानगी मुलीच्या माहेरची सामाजिक आर्थिक परिस्थिती, राहण्याचं ठिकाण, त्याजवळ असलेल्या शिक्षणाच्या सोयी याप्रमाणे बदलते. काही ठिकाणी दहावीपर्यंत शिकू दिलं, हीच मोठी गोष्ट आहे, असं म्हटलं जातं, तर काही ठिकाणी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मुलींना शिकू दिलं जातं.

पण, या शिकलेल्या मुली जेव्हा नोकरी करण्याचा विचार करतात तेव्हा अनेक घरातून असं सांगितलं जातं, की “नोकरी वगैरे तुमच्या स्वतःच्या (म्हणजे नवऱ्याच्या) घरी जाऊन करा!” बरं ज्या मुलींना माहेरी असं सांगितलं जातं, त्यांना सहजासहजी नोकरी करू देणारं सासरही मिळणं कठीण असतं आणि मग अनेक मुली / स्त्रिया ‘आपलं शिक्षण वाया गेलं’ याची सल मनात बाळगून उरलेलं आयुष्य जगतात.
वरवर पाहता अगदी आधुनिक वाटणाऱ्या काळात फक्त स्त्रियांनी नोकरी करण्याला इतका विरोध का होतो? तर त्यामागे अनेक कारणं असतात. पहिलं आणि अत्यंत जुनाट कारण म्हणजे घरातल्या स्त्रियांवर पैसे कमावण्यासाठी नोकरी करण्याची वेळ आली, याचा अर्थ घरातले पुरुष त्यांच्या गरजा भागवू शकत नाहीत, असा सरसकट काढला जातो. अजूनही भारतीय समाजमनामध्ये अर्थार्जनाचं काम घरातल्या पुरुषाचं आणि घरातलं काम हे स्त्रियांचं ही विभागणी बऱ्यापैकी घट्ट आहे. कामाच्या टिपिकल भूमिका कोणीही सोडलेल्या सर्वसामान्य भारतीय मनाला चटकन आवडत नाहीत. म्हणजे स्त्रियांनी शिकावं, नवऱ्याला साजेसं राहावं, वागावं, बोलावं. पण, त्यांनी दुसऱ्याची चाकरी मात्र करू नये. बरं, असा विचार करणारे श्रीमंत असतात तसे गरीबही असतात, अशिक्षित असतात तसे पिढ्यानपिढ्या सुशिक्षित असणारेही असतात, सर्व जाती-धर्माचे असतात. स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारण्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव दिसत नाही.
बायकांनी, त्यातही लग्न झालेल्या महिलांनी नोकरी करू नये, असं म्हणण्यामागचं अजून एक कारण असतं, ते म्हणजे ‘घरातली सून दिवसभर बाहेर गेली तर घराकडे कोण बघणार?’ म्हणजे घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या त्यांच्या वेळेला गरम गरम करून खाऊ कोण घालणार? कारण एकदा का मुलाचं लग्न होऊन सून घरात आली की, सगळी कामं तिनेच करावी, अशीच सगळ्यांची अपेक्षा असते. तिने घरातले सदस्य, आला गेला, पै पाहुणा, कुळधर्म कुळाचार, सण-वार हे सगळं सांभाळून काय ते करावं, अशी अपेक्षा असते. आजकाल कुठल्याही नोकरीत जवळजवळ अशक्य असतं.
स्त्रियांनी नोकरी करू नये, यामागचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, “मुलं झाल्यानंतर नोकरी कशी करणार? मग मुलांकडे कोण बघेल?” भारतात कायद्याने ६ महिने बाळंतपणाची रजा मिळते. पूर्ण सहा महिने रजा मिळाली, तरी त्यानंतर काय? सहा महिन्यांच्या बाळाला सोडून कसं जायचं नोकरीवर? बाळ पाळणाघरात राहिलं पाहिजे, त्याला तसं ठेवणं आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना पटलं पाहिजे किंवा घरातल्या मंडळींनी बाळाची जबाबदारी घेतली पाहिजे. बहुतेक वेळा यातील काहीच होत नाही आणि मग महिलेला हातात असलेली नोकरी सोडावी लागते किंवा भविष्यात असं होईल म्हणून मुळात नोकरी करण्यापासून रोखलं जातं.


 

तरी आशा आहे...

स्त्रियांनी नोकरी करणं याच्या विरोधात इतकी सगळी कारणं असताना अझीम प्रेमजी विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात एक सकारात्मक बाब समोर आली आहे. ज्या महिलांची सासू नोकरी करणारी असते, त्या महिलांनी नोकरी करण्याची शक्यता जास्त असते, असं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. शहरी भागात नोकरी करणाऱ्या सासूच्या सुनेने नोकरी करण्याची शक्यता ७० टक्के जास्त असते, तर ग्रामीण भागात हीच शक्यता ५० टक्के जास्त असते, असंही दिसून आलं आहे.
असं असण्याची कारणं अर्थातच अनेक असू शकतात. पण, नोकरी करणाऱ्या महिलेला त्यातील अडचणी अधिक चांगल्या समजत असतील, ती सुनेला योग्य तो आधार देऊ शकत असेल, याची शक्यता तर आहेच. पण कदाचित असाही असेल की, ज्या स्त्रीने स्वतःची उमेदीची वर्षे धावपळ करत घालवली, तिला सेवानिवृत्तीनंतर घरी थांबून घराकडे लक्ष देण्यात, नातवंडांबरोबर वेळ घालवण्यात आनंद मिळत असेल. किंवा कदाचित तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यातील गंमत समजली असेल आणि ती आपल्या सुनेलाही तो आनंद देऊ करत असेल. कारण काहीही असू दे, वधूवर सूचक मंडळाच्या फॉर्ममध्ये अपेक्षा लिहिताना ‘मुलाची आई नोकरी करणारी असावी’ अशी अपेक्षा लग्नेच्छू मुलींनी लिहून बघायला काहीच हरकत नाही. त्यांना नोकरी करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता त्याने वाढणार असेल तर काय हरकत आहे.

patwardhan.gauri@gmail.com

Web Title: working mother in law help daughter in law to work, build career, research says..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.