lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > परीक्षेच्या दिवसांतच मुलांना खूप झोप का येते? नाटक करतात, असं आईबाबांनी म्हणू नये कारण..

परीक्षेच्या दिवसांतच मुलांना खूप झोप का येते? नाटक करतात, असं आईबाबांनी म्हणू नये कारण..

परीक्षेच्या दिवसातच खूप झोप येणं हे काही फार गंभीर प्रकरण नव्हे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 03:19 PM2024-03-29T15:19:45+5:302024-03-29T15:20:55+5:30

परीक्षेच्या दिवसातच खूप झोप येणं हे काही फार गंभीर प्रकरण नव्हे..

Why do children sleep a lot on exam days? why students sleep too much during exams | परीक्षेच्या दिवसांतच मुलांना खूप झोप का येते? नाटक करतात, असं आईबाबांनी म्हणू नये कारण..

परीक्षेच्या दिवसांतच मुलांना खूप झोप का येते? नाटक करतात, असं आईबाबांनी म्हणू नये कारण..

Highlightsअभ्यासाचा कितीही आणि कोणत्याही कारणाने कंटाळा असला तरी अभ्यास करायचा असतोच.

-डॉ. श्रुती पानसे

मी रात्र रात्र जागू शकतो, तरीही मी फ्रेश असतो, पण परीक्षेच्या काळात मला रात्रीच काय दिवसासुद्धा प्रचंड झोप येते. आठ-दहा तास झोपूनही डोळ्यांवर झापड असते..असं का होत असेल? अनेक मुलं असं काळजीने सांगतात. त्यांचे आईबाबा त्यांना रागावतात, नाटकं करतो म्हणतात पण खरंच मुलं मुद्दाम झोप येते असं म्हणतात का?

खरं सांगायचं तर या प्रश्नांची अनेक उत्तरं आहेत. 

१. अतिताण - जर आपला अभ्यास झाला नसेल तर थोड्या वेळात खूप अभ्यास करायचा आहे यांचा ताण येतो. आणि अति ताणामुळे अभ्यासाकडे मन एकाग्र होऊ शकत नाही. आपल्याला वाचायचं असतं पण जे आपण वाचत आहोत, ते कळत नसतं. आपोआप डोळ्यांवर झापड येते. कधी झोप लागली हे कळत ही नाही.
२. अभ्यास झाला नसेल तरीही अभ्यासाचे तुकडे पाडले तर एकदम अतिताण येणार नाही. वास्तविक थोडा ताण असेल तर तो अभ्यासाला मदत करतो. ताण आहे म्हणूनच तर आपण आव्हान घेतो. ताण आहे म्हणून आपण काम चांगलं करतो. पण जर विचार करून करून ताण जास्त झाला तर तो घातक ठरतो.  असा ताण अभ्यासापासून दूर नेतो. म्हणून योग्य टाईम टेबल आणि योग्य तुकडे पाडून अभ्यास केला पाहिजे.
३. चलनवलन कमी – एरवी शाळा चालू असताना शाळेत जाणं – येणं- खेळणं – गप्पा गोष्टी हे आपण करत असतो. आणि परीक्षेसाठी सुट्टी मिळाली की एकदम दिवसभर मोकळा वेळ मिळतो. कुठे जायचं यायचं नसतं त्यामुळे अभ्यासासाठी दिवसभर बसून असतो. खाणं आणि जेवण एवढंच चालू असतं. साहजिकच शरीर जड होतं. शरीराला कंटाळा येतो. आणि त्यामुळेच झोप येते.

४. शाळेत जाणं येणं नसलं तरी अभ्यास करताना अधून मधून ब्रेक घेतले पाहिजेत. त्या वेळात पाच मिनिटांत एक चक्कर मारून आलं तर ताजंतवानं वाटेल.
५. अभ्यास करायला बसण्यापूर्वी एक चालत- पळत- सायकलवर फिरून आलं, व्यायाम केला तर झापड कमी होईल. जी मुलं एरवी खेळतात, त्यांनी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खेळ सोडला तर शरीरातली ऊर्जा कमी होते. म्हणून खेळ अचानक थांबवायला नको. वेळ कमी करता येईल. एरवी दोन तास खेळत असाल तर एक तास खेळा.

६. कंटाळा – काही जणांना अभ्यासाचा उपजत कंटाळा असतो. बैठी कामं करावीशी वाटत नाहीत. लेखन वाचन नकोसं वाटतं. त्यांना एकूण अभ्यासाचा कंटाळच असतो.
७. अभ्यासाचा कितीही आणि कोणत्याही कारणाने कंटाळा असला तरी अभ्यास करायचा असतोच. तो प्रत्येकाला करावा लागतोच. त्यामुळे आपलं लक्ष काहीही करून अभ्यासाकडे वळवलं पाहिजे.

(संचालक, अक्रोड)
shruti.akrodcourses@gmail.com

Web Title: Why do children sleep a lot on exam days? why students sleep too much during exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.