Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीठ न आंबवता झटपट तयार होणारा अडई डोसा; नाश्ता, जेवण, टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:55 IST

Multimillet Adai Dosa: खमंग आणि पौष्टिक 'अडई डोसा', भरपूर प्रोटिन्स देणारी दक्षिण भारतीय रेसिपी; एकदा तरी नक्की ट्राय करा. 

महाराष्ट्रीय घरांमध्ये सकाळच्या न्याहारीसाठी उपमा, पोहे, तांदळाची उकड, आंबोळी, शेवईचा उपमा याबरोबरच इडली, डोसा, अप्पे, मेदू वडे हे पदार्थही चवीने केले आणि खाल्ले जातात. दशकभरापूर्वी तर दर रविवारी इडली, डोसा ठरलेला असे. आदल्या दिवशी पीठ तयार करून रात्रभर आंबवून घ्यायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गरमागरम नाश्ता तयार! यात आता विविध प्रकार बघायला मिळतात. गृहिणी ते करूनही बघतात. याच प्रयोगशाळेत आणखी एक आवर्जून करण्यासारखा पदार्थ म्हणजे अडई डोसा. जो पचायला हलका, पौष्टिक आणि पोटभरीचा खाद्यपदार्थ आहे. 

अडई डोसा हा तामिळनाडूतील एक पारंपारिक पदार्थ आहे. यात तांदळासोबत विविध डाळींचा वापर केला जातो, ज्यामुळे तो आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. विशेष म्हणजे, याच्या पिठाला आंबवण्याची (Fermentation) गरज नसते, त्यामुळे हा झटपट तयार होतो.

आजच्या धावपळीच्या युगात वजन कमी करणे आणि फिट राहणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. आपण तासनतास जिममध्ये घाम गाळतो किंवा कडक डाएट करतो, पण तरीही पोटाचा घेर कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या आहारात कर्बोदकांचे (Carbs) प्रमाण जास्त आणि प्रथिनांचे (Proteins) प्रमाण कमी असते.

जर तुम्हालाही विनासायास वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या रोजच्या आहारात 'Multimillet Adai Dosa' चा समावेश करा. हा डोसा चवीला तर अफलातून आहेच, पण आरोग्यासाठी 'सुपरफूड' पेक्षा कमी नाही.

Multimillet Adai Dosa का आहे खास?

सामान्य डोसा हा तांदळापासून बनतो, ज्यामुळे शरीरात ग्लुकोजची पातळी वाढू शकते. मात्र, 'अडई डोसा' हा तांदळासोबतच ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मिश्र डाळींनी बनलेला असतो.

प्रोटीनचा खजिना: विविध डाळींमुळे हा डोसा स्नायूंच्या मजबुतीसाठी उत्तम आहे.

नो फर्मेंटेशन: या पिठाला आंबवण्याची गरज नसते, त्यामुळे हे पचायला हलके आणि झटपट होणारे आहे.

फायबरने भरपूर: मिलेट्समुळे यात फायबर जास्त असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.

साहित्य (Ingredients):

मिलेट्स: अर्धा कप नाचणी, अर्धा कप ज्वारी आणि अर्धा कप बाजरी (किंवा बाजारात मिळणारे मल्टीमिलेट पीठ).

डाळी: अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप तूर डाळ, २ चमचे उडीद डाळ.

मसाले: ४ सुक्या लाल मिरच्या, १ इंच आलं, पाव चमचा हिंग, १०-१२ कढीपत्ता पाने.

चवीसाठी: बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.

करण्याची सोपी पद्धत:

१. भिजवणे: सर्व मिलेट्स आणि डाळी एकत्र करून ३-४ तास पाण्यात भिजत ठेवा. सोबत सुक्या लाल मिरच्याही टाका. 

२. वाटणे: भिजलेले मिश्रण उपसून त्यात आलं, हिंग आणि कढीपत्ता घालून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. (पीठ खूप गुळगुळीत करू नका, अडई डोसा थोडा रवाळ छान लागतो). 

३. मिश्रण: वाटलेल्या पिठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मीठ घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी मध्यम ठेवा. 

४. भाजणे: तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप सोडा आणि डोसा पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत भाजून घ्या.

५. मिलेट्स नसतील तर नुसत्या डाळींचा वापर करूनही वरील पद्धतीनुसार डोसा करू शकता त्यातही डाळींचे पुरेपूर फायदे मिळतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Instant Multimillet Adai Dosa: Healthy, quick recipe for breakfast, lunch, dinner.

Web Summary : Multimillet Adai Dosa, a Tamil Nadu staple, is a healthy, quick alternative to regular dosa. Made with millets and lentils, it's protein-rich, fiber-filled, and requires no fermentation. This recipe is perfect for weight management and a nutritious diet.
टॅग्स :अन्नपाककृतीवेट लॉस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्सआरोग्य