रोजच्या धावपळीच्या जीवनात शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन (प्रथिने) मिळवणे हे मोठे आव्हान असते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. पण सोयाबीनची भाजी नेहमीच चविष्ट लागते असे नाही. अशा वेळी चव आणि आरोग्य यांचा मेळ घालणारा 'प्रोटीन रिच सोया दाल पराठा' हा एक उत्तम पर्याय ठरतो. हा पराठा केवळ पौष्टिकच नाही, तर जेवणासाठीही उत्तम पर्याय ठरू शकतो. जाणून घेऊया याची सविस्तर रेसिपी आणि आरोग्यासाठी फायदे.
हा पराठा करण्यासाठी आपण सोयाबीनसोबत चणा डाळ आणि दुधीचा वापर करणार आहोत, ज्यामुळे याची पौष्टिकता द्विगुणित होते. विशेष म्हणजे दुधी आणि सोयाबीनला नाक मुरडणारेसुद्धा ही रेसिपी चवीने खातील, कारण हे दोन्ही पदार्थ पराठ्यात एकजीव झाल्याने त्यांना ओळखता येणार नाही आणि पोषणही मिळेल. चला तर पाहूया प्रत्यक्ष कृती.
साहित्य :
१ कप भिजवून पाणी काढून घेतलेले सोयाबीन
अर्धा वाटी चणा डाळ
अर्धा कप दुधी (चिरलेला किंवा किसलेला)
२ छोटे कांदे (बारीक चिरलेले)
१ तमाल पत्र
५ लसूण पाकळ्या
एक छोटी मसाल्याची पुडी (ज्यात दालचिनीचा तुकडा, ४ लवंगा आणि १ मोठी वेलची असेल)
१ कप पाणी (मिश्रण शिजवण्यासाठी)
१ कप गव्हाची कणिक
१ चमचा गरम मसाला
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तूप किंवा तेल (पराठे शेकण्यासाठी)
कृती
१. शिजवून घेणे:
कुकरमध्ये सोयाबीन, चणा डाळ, दुधी, चिरलेला कांदा, तमाल पत्र, लसूण आणि खड्या मसाल्यांची छोटी पुडी (पोटली) घाला. १ कप पाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या काढून घ्या.
२. एकजीव करणे:
कुकरची शिटी उतरल्यावर खड्या मसाल्यांची पुडी बाहेर काढून टाका (यामुळे मसाल्यांचा अर्क उतरतो पण ते खाताना मध्ये येत नाहीत). आता उरलेले सर्व जिन्नस रवीने किंवा चमच्याने व्यवस्थित घोटून एकजीव करून घ्या.
३. पीठ मळणे:
या तयार मिश्रणात १ कप कणिक, गरम मसाला, हळद, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. पाण्याचा वापर न करता या मिश्रणातच कणकेचा गोळा मळून घ्या.
४. पराठे लाटणे:
कणिक थोडा वेळ झाकून ठेवा. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून पराठे लाटून घ्या. तव्यावर तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घ्या.
हे गरमागरम पराठे दही-बुंदी, काकडीची कोशिंबीर तसेच पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करता येतील.
टिप: जर तुम्हाला पराठे अधिक कुरकुरीत हवे असतील, तर पीठ मळताना त्यात थोडा ओवा आणि १ चमचा बेसन देखील घालू शकता.
आरोग्यदायी फायदे
प्रोटीनचा खजिना: सोयाबीन आणि चणा डाळ यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक प्रथिने मिळतात.
पचायला हलके: दुधीचा वापर केल्यामुळे पराठे मऊ होतात आणि पचन सुलभ होते.
ऊर्जेचा स्रोत: गव्हाचे पीठ आणि डाळींमुळे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.
हा प्रोटीनने भरपूर असलेला पराठा तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला नक्की देऊ शकता! तुमची ही रेसिपी कशी वाटली? नक्की सांगा. पाहा व्हिडिओ -
