Onion Juice For Hair Facts : आजकाल केस गळणे ही खूप सामान्य समस्या झाली आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार, हार्मोनल बदल, कोंडा आणि प्रदूषण यांसारख्या अनेक कारणांमुळे लोकांना हेअर फॉलचा सामना करावा लागतो. अशावेळी घरगुती उपायांमध्ये कांद्याचा रस सर्वाधिक चर्चेत असतो. अनेकांचा विश्वास आहे की कांद्याचा रस लावल्याने केस गळणे कमी होते आणि नवीन केसही उगवतात. पण हे खरंच कितपत खरं आहे? सत्य हे आहे की कांद्याचा रस काही प्रमाणात केसांसाठी फायदेशीर ठरू शकतो, पण तो जादुई उपाय नाही.
कांद्याच्या रसाने कसा मिळतो फायदा?
कांद्याच्या रसात सल्फर भरपूर प्रमाणात असतं. सल्फर हा केसांसाठी महत्त्वाचा घटक आहे. केस मुख्यपणे केराटिन या प्रोटीनपासून बनलेले असतात. केराटिनमध्ये सल्फर असतं. त्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते. अशात केस तुटणे कमी होऊ शकतं, मुळांना पोषण मिळू शकतं आणि नवीन वाढीस मदत होऊ शकते.
केस गळणे कमी होतं का?
कांद्याचा रस स्काल्पमधील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करू शकतो. जास्त रक्तप्रवाह म्हणजे केसांच्या मुळांना अधिक पोषण. काही अभ्यासांमध्ये केसांची वाढ दिसून आली होती, पण अजून अधिक संशोधनाची गरज आहे. मात्र हे लक्षात ठेवा की, टक्कल पडणे यावर हा कायमस्वरूपी इलाज नाही.
लावण्याची योग्य पद्धत
एक कांदा किसून किंवा वाटून रस काढा. कापसाच्या मदतीने स्काल्पवर लावा. 20 ते 30 मिनिटे तसाच ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करू शकता. कांद्याच्या रसात हवं असल्यास खोबऱ्याचं तेल किंवा अॅलोव्हेरा जेल मिक्स करू शकता. यामुळे जळजळ कमी होऊ शकते.
काळजी घ्या
कांद्याचा रस टाळूवर जास्त जास्त वेळ ठेवू नका. जळजळ, खाज, लालसरपणा झाला तर लगेच धुवा. संवेदनशील त्वचा असेल तर आधी पॅच टेस्ट करा.
