Ratnagiri: पाच पिढ्या होतेय रानातील मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना, कोळथरे येथील महाजन कुटुंबीयांची परंपरा कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:56 IST2025-08-29T15:56:44+5:302025-08-29T15:56:54+5:30
श्रद्धा, निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

Ratnagiri: पाच पिढ्या होतेय रानातील मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना, कोळथरे येथील महाजन कुटुंबीयांची परंपरा कायम
दापोली : कोकणात गणेशोत्सव साजरा करण्याची प्रत्येकाची परंपरा वेगळी असते. काही जण इको फ्रेंडली गणपतीची प्रतिष्ठापना करतात. मात्र, दापोली तालुक्यातील कोळथरे गाव येथील महाजन कुटुंब रानात जाऊन तेथील माती आणून त्यापासून स्वत:च हाती गणपती तयार करुन त्याची पूजा करतात. या आगळ्यावेगळ्या उत्सवाची परंपरा गेल्या पाच पिढ्या हे कुटुंब जपत आहे.
गणेशतीच्या आगमनच्या दिवशी महाजन कुटुंब प्रथम रानात जात. तेथे मातीची पूजा करून ती घरी आणली जाते. या मातीपासून हाताने मूर्ती साकारली जाते. ही मूर्ती साच्यातून न बनवता, हाताने आकार देऊन साकारली जाते. त्यानंतर या मुर्तीची प्रतिष्ठापना करुन पूजन केले जाते.
महाजन कुटुंबातील ही परंपरा आजची पिढी तितक्याच भक्तिभावने जपत आहे. आधुनिकतेच्या लाटेतही ही शतकांपूर्वीची परंपरा या कुटुंबाने ही परंपरा जपली आहे. या कुटुंबाने प्लस्टर ऑफ पॅरिस किंवा अन्य कोणत्याही साधनांचा वापर न करता पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करुन पर्यावरणपूरक संदेशही दिला आहे. तसेच श्रद्धा, निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगमही पाहायला मिळत आहे.