कोकणकरांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी'चे अन्य विभाग दिमतीला; मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमधील गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:25 IST2025-08-29T16:25:12+5:302025-08-29T16:25:44+5:30
मार्ग तपासणी/दक्षता पथक तैनात

कोकणकरांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी'चे अन्य विभाग दिमतीला; मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूरमधील गाड्या दाखल
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईकर कोकणात दाखल झाले आहेत. मुंबईतून कोकणात उत्सवासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी पाच हजार जादा गाड्या येणार आहेत. दि. २३ ऑगस्टपासून जादा गाड्यांचे आगमन सुरू झाले असून, दि. २६ पर्यंत जादा गाड्या येणार आहेत. उत्सव कोकणातला असला तरी महामंडळातील अन्य विभागांनीही मदतीचे हात पुढे केले आहेत.
राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येते. मुंबई, ठाणे व पालघर येथून कोकणात पाच हजार जादा गाड्या येणार आहेत. गौरी-गणपतीचा सण साजरा करण्यात आल्यानंतर परतीसाठी दि. २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाड्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.
मार्ग तपासणी/दक्षता पथक तैनात
अपहार प्रवृत्तीला आळा बसावा, राज्य परिवहन महामंडळाच्या वैध उत्पन्नास कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ नये यासाठी जादा वाहतुकीवेळी मुंबई ते कोकण मार्गावर २४ तास तपासणी पथके कार्यरत असणार आहेत. त्यासाठी सांगली, सातारा, नाशिक विभागाची पथके मदत करणार आहेत.
देखभाल दुरुस्ती पथक
उत्सवासाठी आलेल्या जादा गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी देखभाल पथकांमध्ये किमान १० यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्येही नाशिक, पुणे, धुळे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर येथील कर्मचारी सहभागी होणार आहेत. एकूण १२ ठिकाणी ही पथके कार्यरत राहणार आहेत.
दुरुस्ती पथके
मुंबईपासून सावंतवाडीपर्यंत एकूण १२ दुरुस्ती पथके उत्सवकाळात कार्यरत राहणार आहेत. दुरुस्ती पथकांमध्ये नाशिक, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी पथके कार्यरत राहणार आहेत. जादा वाहतूक करताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बस नादुरुस्त झाल्यास तातडीने दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.
बसची उपलब्धता
कोकणात एकूण ४,२२३ ग्रुप बुकिंग तर ७७७ ऑनलाइन मिळून एकूण ५,००० जादा गाड्या कोकणात आल्या आहेत. यासाठी अन्य विभागांनी गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे मुंबई प्रदेशकडून ६००, पुणे व छत्रपती संभाजीनगर प्रदेशकडून प्रत्येकी १,२५०, नाशिक येथून १,२७५, अमरावती ३२५, नागपूर येथून २०० मिळून एकूण ४,९०० बसची उपलब्धता अन्य विभागांनी केली आहे.