रत्नागिरी: नगराध्यक्ष निवडणुकीत आरोपांच्या फैरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 17:42 IST2019-12-05T17:36:06+5:302019-12-05T17:42:12+5:30
रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे.

रत्नागिरी: नगराध्यक्ष निवडणुकीत आरोपांच्या फैरी!
रत्नागिरी: रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तर शिवसेना, शहर विकास आघडी व भाजप यांच्यात तेहरी लढत होण्याची शक्यता आहे. तर राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना मिलिंद कीर यांनी अनेक विकासकामे अडवून ठेवली. लाखो रुपये खर्चून अर्धवट स्थितीत बांधलेला शहरातील परटवणे पूल वापराविना पडून आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना पुलाचे काम आपण केल्याचे सांगणाऱ्या मिलिंद कीर यांनी अपूर्णावस्थेत असलेल्य पुलाची जबाबदारीही घ्यावी, रत्नागिरीकरांची दिशाभूल करू नये, असा टोला प्रभारी नगराध्यक्ष व नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.
साळवी यांनी केलेल्या आरोपाला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उत्तर दिले आहे. रत्नागिरी शहरातील पटवणे पुलाच्या बॉक्सचे ४६ लाखांचे काम ७ मार्च २०१३पर्यंत आपण नगराध्यक्ष असताना पूर्ण केले होते. तसेच उर्वरित कामासाठी ६० लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र, २०१६ पासून नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना थेट नगराध्यक्ष राहुल पंडित यांना विकासाची कामे करण्यामध्ये बंड्या साळवी यांनीच अडथळा केला. गेल्या ६ महिन्यांपासून साळवी यांनी कोणता विकास केला, हे दाखवून द्यावे, असा प्रतिहल्ला मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
राज्यातील सत्तेच्या चाव्या हाती नसलेल्यांकडून जनतेला शहर विकासाच्या मोठ्या योजना दाखविल्या जात आहेत. आचारसंहितेपूर्वी कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनता शिवसेनेच्याच पाठीशी राहील, असा विश्वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला. तर राहुल पंडित यांच्या नगराध्यक्षपद राजीनाम्यानंतर बंड्या साळवी हे गेल्या ६ महिन्यांपासून प्रभारी नगराध्यक्ष आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी केल्यानंतरही पुन्हा नगर परिषदेच्या निधीतून बुजविण्यात आले आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यात आले, असा आरोप कीर यांनी केला आहे.