पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या १३,८४१ गणरायांना साश्रू नयनांनी निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:14 IST2025-08-29T16:13:22+5:302025-08-29T16:14:00+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील खासगी १३,८३४ आणि सार्वजनिक ७ अशा ...

Farewell to 13841 Ganeshas for one and a half days in Ratnagiri district | पुढच्या वर्षी लवकर या!, रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसाच्या १३,८४१ गणरायांना साश्रू नयनांनी निरोप

छाया-तन्मय दाते

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारी दीड दिवसाच्या गणरायांचे विसर्जन झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील खासगी १३,८३४ आणि सार्वजनिक ७ अशा एकूण १३,८४१ गणेशांना भाविकांनी ‘गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात निरोप दिला. विसर्जनावेळी पावसाने उसंत घेतली होती.

पावसाच्या वर्षावात बुधवारी भक्तांच्या लाडक्या बाप्पाचे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात उत्साहात आगमन झाले. काही ठिकाणी वाहनातून, तर काही ठिकाणी डोक्यावरून बाप्पा घरी आले. विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे सर्वत्र आनंद, उत्साह, चैतन्याचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात १२६ सार्वजनिक, तर १ लाख ६९ हजार ४१७ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सर्वत्र सकाळ-संध्याकाळ सुगंधी वातावरणात आरत्यांचे आवाज घुमू लागले आहेत.

ग्रामीण भागात रात्री जाखडीनृत्य आयोजित केले जात आहे. तर काही ठिकाणी फुगड्यांनी रात्र जागविली जात आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे जिल्हाभरात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
यंदा गणेशोत्सव सात दिवसांचा आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) गणेशांचे विसर्जन होणार आहे. मात्र, काहींचे गणपती दीड दिवसाचे आहेत. त्यामुळे गुरुवारी दुपारी दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला.

जिल्ह्यात १३,८३४ खासगी आणि ७ अशा एकूण १३,८४१ गणेशमूर्तींचे विविध ठिकाणी भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी भावनिक आळवणी करत भक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 

Web Title: Farewell to 13841 Ganeshas for one and a half days in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.