Ratnagiri: दापोलीत सेफ्टी टँकचा स्फोट; इमारतीच्या सुरक्षेलाही धोका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:49 IST2025-07-01T17:48:15+5:302025-07-01T17:49:37+5:30
इमारत कोसळण्याच्या भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट

Ratnagiri: दापोलीत सेफ्टी टँकचा स्फोट; इमारतीच्या सुरक्षेलाही धोका?
दापोली : शहरातील कोळंबा आळी परिसरात रविवारी मध्यरात्री एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणावर मैला वाहून पंचायत समिती परिसरातील घरांपर्यंत पोहोचला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डोंगर उत्खनन करून उभारण्यात आलेल्या तीन सदनिकांच्या या इमारतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. चुकीचे बांधकाम केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर इमारतीचे संरचनात्मक स्थैर्य धोक्यात असल्याने ती कोसळण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. ही इमारत कोसळण्याच्या भीतीने स्थानिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या इमारतीच्या सुरक्षेची तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा कृपा घाग यांनी धोकादायक इमारतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित घटनेची तातडीने चौकशी करून कठोर उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे.