अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा ‘मार्ग’ सुकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:21 IST2025-12-27T10:21:06+5:302025-12-27T10:21:22+5:30
प्रभागनिहाय भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाईच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा ‘मार्ग’ सुकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करायला येणाऱ्या उमेदवारांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी सहा प्रभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून आदर्श आचारसंहिताचे पालन करण्याच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करून पार्किंगचे नियोजन करण्याच्या सूचना शुक्रवारी आयुक्त मंगेश चितळे यांनी केल्या.
या शिवाय सर्व विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून नियोजन करून काम करण्याविषयी सांगितले . तसेच एक खिडकी योजनेतून वाहनांना परवाना देणे, प्रमाणपत्र देण्याविषयीच्या सूचना या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिका मुख्यालयात उत्पादन शुल्क, परिवहन व वाहतूक विभागाची बैठक घेतली. बैठकीत तीनही विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक रॅली, प्रचार मिरवणुकीदरम्यान वाहनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयीच्या सूचना परिवहन विभागास दिल्या. प्रचार रॅलीचे मार्गाविषयी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती करून घेणे. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, तपासणी नाक्यावर संशयास्पद वाहनांची चौकशी करण्यास सांगितले. उत्पादन शुल्क विभागास भरारी पथकांच्या साह्याने चेकपोस्ट नाक्यांवरती बनावट दारू, अवैध वस्तू यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेकडून ‘सुवर्णदुर्ग’वर चाेख व्यवस्था
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सरकारी प्रशासन व संबंधित यंत्रणा पूर्ण ताकदीने निवडणूक प्रक्रियेत कार्यरत झाल्या आहेत. कामोठे परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पनवेल महापालिकेच्या ‘सुवर्णदुर्ग’ या इमारतीत प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ साठी स्वतंत्र निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज, निवडणूक प्रचारासंदर्भातील रॅली परवानगीचे अर्ज व अन्य आवश्यक फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे परिसरात गर्दी हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययाेजना करण्यात आली आहे.