एकीकडे छाननी, दुसरीकडे धाकधूक! पनवेलमध्ये ३९३ उमेदवारी अर्जांपैकी २९३ उमेदवारी अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:21 IST2026-01-01T14:18:13+5:302026-01-01T14:21:30+5:30
Panvel Municipal Corporation Election 2026: भाजपचे नितीन पाटील बिनविरोध, शेकापचे रोहन गावंड यांचा उमेदवारी अर्ज बाद

एकीकडे छाननी, दुसरीकडे धाकधूक! पनवेलमध्ये ३९३ उमेदवारी अर्जांपैकी २९३ उमेदवारी अर्ज वैध
Panvel Municipal Corporation Election 2026 | लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी पार पडली. यामध्ये अनेक उमेदवारांना धाकधूक लागली होती. रात्री उशिरापर्यंत छाननी सुरू राहिल्याने एक प्रभाग वगळून ३९३ उमेदवारी अर्जापैकी २९३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये शेकापचे उमेदवार रोहन गावंड यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने भाजपचे नितीन पाटील हे बिनविरोध आले. तर खारघर प्रभाग ४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार अँड. शिल्पा ठाकूर या बाद ठरल्या आहेत. प्रभाग ५ मध्ये उद्धवसेनेच्या लीना गरड आणि भाजपच्या हर्षदा उपाध्याय यांनी एकमेकांवर आक्षेप घेतल्याने दोन तास चाललेल्या सुनावणीत दोघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. प्रमुख पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्याने काही इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले.
निवडणूक निरीक्षकांची भेट
पनवेल महापालिकेसाठीचे मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे आणि अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी पनवेल शहरातील खारघर, कळंबोली, कामोठे, आणि पनवेल येथे भेट देऊन कर्मचारी प्रशिक्षण, व्यवस्थापन, आणि एक खिडकी योजनेबाबत माहिती घेतली. महापालिका मुख्यालयास भेट देऊन तिथे झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला. आचारसंहिता आणि माध्यम प्रमाणन व संनियंत्रण कक्षास देखील त्यांनी भेट दिली. मतदानाबद्दल जनजागृतीसाठी 'होय मी मतदान करणार' उपक्रमाची सुरुवात देखील केली.