'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:50 IST2022-12-04T17:49:21+5:302022-12-04T17:50:47+5:30
अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर थांबणार

'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी
मधुकर ठाकूर
उरण: मागील पाच वर्षांच्या खडतर पाठपुराव्यानंतर अखेर दिड कोटी रुपये निधीतून उलवे सेक्टर १४ मध्ये नोडमधील सुमारे दोन लाख रहिवाशांसाठी हक्काची स्मशानभूमी उभारण्यात येत आहे.त्यामुळे मागील १८ वर्षांपासून उलवे नोड वासीयांची मृत्यूनंतर होत असलेली सशेहोलपट थांबणार आहे.
उलवे नोड अस्तित्वात आल्यानंतर सुमारे १८ वर्ष उलटून गेली आहेत.मात्र त्यानंतरही १८ वर्षात दोन लाखाहुन अधिक लोकवस्तीच्या रहिवाशांची स्मशानभूमी अभावी कुंचबणा होत आहे. मृत्यु झाल्यास अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे मयताचे नातेवाईक प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांकडे मिनतवाऱ्या कराव्या लागतात. त्यातील अनेक गावांनी नोडलमधील मृतदेहावर स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी मज्जाव करतात.त्यामुळे मृतदेह अंत्यविधीसाठी सीबीडी, बेलापूर, खारघर, वाशी येथे अंत्यविधीसाठी जावे लागते.
उलवे नोड मधील अनेक नागरिकांच्या फोरमने स्मशानभूमीसाठी रायगड कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांना गळ घातली होती. कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको स्तरावर एमडी,जॉईंट एमडी यांच्या सोबत उलवे नोड नागरिकांच्या बैठका घेऊन समस्या मांडल्या.मागील पाच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर दिड कोटी निधी मंजूर करण्यात आला.त्यानंतर उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर १४ मध्ये उभारण्यात घेतली आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे.त्यामुळे उलवे नोडवासीयांची मृत्यूनंतरही मागील १८ वर्षांपासून होत असलेली सशेहोलपट अखेर थांबणार आहे.