तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? कळंबोली, तळोजातील मतदार उमेदवारांवर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:33 IST2026-01-05T11:31:08+5:302026-01-05T11:33:11+5:30
Panvel Municipal Election 2026: रासायनिक टँकर, कंटेनरमुळे कोंडीत भर, कचरा-डेब्रिजचा विळखा

तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? कळंबोली, तळोजातील मतदार उमेदवारांवर नाराज
Panvel Municipal Election 2026: निवडणूक आली की शहरातील समस्या सोडवण्याचे आश्वासन सर्वपक्षीय उमेदवारांकडून दिले जाते. फलक, घोषणा, रॅली, समाजमाध्यमांवरील पोस्ट्स यांचा पाऊस पडतो; पण या सगळ्या आवाजात एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे सामान्य नागरिकाचा आवाज हरवतो आहे. पनवेल महापालिका निवडणूकही याला अपवाद नाही. नागरिकांना रोज भेडसावणारे प्रश्न फार साधे आहेत. रस्त्यावरचे खड्डे कधी बुजणार, नळाला नियमित पाणी कधी येणार, अखंडित वीज कधी मिळणार, चांगले नाट्यगृह व उद्यान शहराला कधी मिळणार, फुटपाथ चालण्यासाठी आहेत की अतिक्रमणासाठी आणि आजारी पडलो तर घराजवळ दर्जेदार उपचार मिळणार का? हे प्रश्न आजही भेडसावत आहेत.
घनकचरा : कळंबोली वसाहतीत कचरा, डेब्रिजचा विळखा
कळंबोली परिसरातील विविध वसाहतींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक मोकळे भूखंड साफसफाई अभावी डेब्रिज टाकण्याचे केंद्र बनले आहेत. बांधकामातून निघणारा मलबा, घरगुती कचरा व प्लास्टिक सर्रास टाकले जात असल्याने परिसराचे विद्रूप रूप झाले आहे. विशेष म्हणजे तलावाच्या शेजारीही कचरा व डेब्रिज टाकला जात असून त्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अस्वच्छतेमुळे डास, उंदीर व दुर्गंधीचा त्रास वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
प्रदूषण : दूषित वातावरणामुळे कळंबोलीकरांचा कोंडतोय श्वास
तळोजा एमआयडीसी आहे. या ठिकाणी रासायनिक कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपनीतून निघणाऱ्या धुराने कळंबोलीकरांचा जीव नकोसा झाला आहे. एकीकडे महापालिका यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने प्रदूषणाकडे पालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. या कंपन्या दिवसाढवळ्या विषारी केमिकल वायू हवेत सोडूनही यंत्रणेच्या नजरेस कसे पडत नाही, हे मोठे आश्चर्य आहे. प्रदूषण एवढे वाढले आहे की, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये काजळी आली आहे. आम्ही गुदमरून मरावे, अशी तर यंत्रणांची इच्छा नाही ना? असा प्रश्न कळंबोली पक्ष व संभाव्य उमेदवारांना विचारला जात आहे. वायू प्रदूषणामुळे परिसरात उग्र दर्पही येतो.
अवजड वाहतूक : रासायनिक टँकर, कंटेनरमुळे कोंडीत भर
कळंबोली वसाहतीत सध्या गंभीर नागरी समस्या निर्माण झाली असून, वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर सर्रासपणे अवजड वाहने उभी केली क जात आहेत. यामध्ये रासायनिक टँकरांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाहनांमुळे रस्ते अक्षरशः काबीज झाले असून, वाहनांची ये-जा अडथळलेली आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने धोका वाढला आहे. रासायनिक टैंकर उभे राहिल्याने अपघात किंवा गळती झाल्यास मोठी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारी करूनही यंत्रणांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
जलधारण तलाव : कळंबोलीत पावसाळी पाण्याचा निचरा ठप्प
पा वसाळ्यात मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी सेक्टर ४ येथील जलधारण तलाव महत्त्वाची भूमिक बजावतो; मात्र हा तलाव गाळाने भरल्याने त्याची पाण साठवण आणि निचरा क्षमता कमी झाली आहे. महापालिकेकडून कळंबोली येथील जलधारण तलाव गाळमुक्त करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात हालचाली दिसत नाही. परिणामी रस्ते, वसाहतींमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांच्या घरात शिरते.
तुमच्याही भागात असे काही प्रश्न असतील तर ते फोटोसह आम्हाला २५२४०५७२५५ या नंबरवर पाठवा. तुमच्यासाठी आम्ही ते निवडणुकीचे मुद्दे बनवू.