प्रचाराची डोकेदुखी! वेळी-अवेळी फोन; उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलने पनवेलच्या मतदारांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 10:59 IST2026-01-11T10:58:15+5:302026-01-11T10:59:29+5:30
Panvel Municipal Election 2026: निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी

प्रचाराची डोकेदुखी! वेळी-अवेळी फोन; उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलने पनवेलच्या मतदारांचा संताप
Panvel Municipal Election 2026 | पनवेल: आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारांना उमेदवारांकडून रेकॉर्डेड फोन येत आहेत. दोन दिवसांत फोनचा हा भडीमार वाढला आहे. विशेष म्हणजे एका प्रभागातील मतदारांना दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांचे वेळी-अवेळी फोन येत असल्याने नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक मतदारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, असे फोन येणे हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे. पनवेलमधील एका नागरिकाने सांगितले की, माझ्या नंबरवर एक रेकॉर्डेड फोन आला. त्यात एका उमेदवाराचा संदेश होता. पण मी त्याच्या प्रभागात राहत नाही, माझा नंबर त्याला कसा मिळाला, असे प्रश्न त्याने उपस्थित केले. सध्या प्रचारावर जोर दिला जात आहे.
कारवाईची मागणी
एआय जनरेटेड व्हिडीओ, इन्स्टाग्राम, फेसबुक आदींवर मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असताना रेकॉर्डेड फोन कॉलमुळे नागरिक पुरते हैराण आहेत. संबंधित यंत्रणांकडे एवढ्या मोठ्या संख्येने फोन नंबरचा डेटा कुठून आला? याबाबत चौकशीची मागणी होत आहे. मतदारांना गोंधळात टाकणारे कोणतेही संदेश किंवा फोन हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन ठरतो का? याबाबतही प्रशासनाने खातरजमा करून कारवाईची मागणी होत आहे.