पनवेलच्या रिंगणात १०४ लाडक्या बहिणी! बिनविरोध सदस्यांमध्ये महिलांचा बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:44 IST2026-01-08T15:42:58+5:302026-01-08T15:44:44+5:30
मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या १९ जणींना पुन्हा संधी दिली असून यामध्ये बहुतांशी या भाजपच्या उमेदवार आहेत

पनवेलच्या रिंगणात १०४ लाडक्या बहिणी! बिनविरोध सदस्यांमध्ये महिलांचा बोलबाला
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : पनवेल महापालिकेच्या रिंगणात एकूण २५५ उमेदवार आहेत. यापैकी १०४ महिला उमेदवार असल्याने येणाऱ्या नव्या बॉडीमध्ये महिलांचा सहभाग मोठा असणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या १९ जणींना पुन्हा संधी दिली असून यामध्ये बहुतांशी या भाजपच्या उमेदवार आहेत.
भाजपने माजी महापौर डॉ. कविता चौतमोल यांना पुन्हा प्रभाग १६ मधून संधी दिली आहे. तर प्रभाग २० मधून निवडून आलेल्या माजी नगराध्यक्ष आणि प्रथम उपमहापौर चारुशीला घरत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या निवडणुकीत संधी मिळाली नाही.
गत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नगरसेविका शेकापमधून निवडून आल्या होत्या. कालांतराने पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक भाजपमध्ये आले. या नगरसेविकांना भाजपने संधी दिली आहे. यामध्ये डॉ. सुरेखा मोहोकर यांचा समावेश नसला तरी त्यांना योग्य पुनर्वसनाचे आश्वासन दिले आहे. याआधीही महिला लोकप्रतिनिधींनी अनेक समस्यांवर आवाज उठवल्याचे पाहावयास मिळले आहे.
बिनविरोध सदस्यांमध्ये महिलांचा बोलबाला
पनवेल पालिकेत ७ बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. यामध्ये ४ महिलांचा समावेश आहे. ममता प्रीतम म्हात्रे, स्नेहल स्वप्नील ढमाले, रुचिता गुरुनाथ लोंढे आणि दर्शना भगवान भोईर यांचा समावेश आहे.
मेट्रोपोलिटन परिसरात महिलांचा आवाज बुलंद
पनवेल महापालिका परिसर हा मेट्रोपोलिटन परिसर म्हणून नावारूपाला येत आहे. अद्यापही या ठिकाणी बहुभाषिक मराठी वास्तव्यास आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक महिला रिंगणात आहेत. खारघर आणि कामोठ्यातील अपवाद वगळता उर्वरित सर्व प्रभागात मराठी भाषिक महिलाच उमेदवार आहेत.