प्रचाराचा सुपर संडे; मॉर्निंग वॉक, गाठीभेटी सुरू; जास्तीत जास्त मतदारांना गाठण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:00 IST2026-01-05T10:59:48+5:302026-01-05T11:00:20+5:30
Panvel Municipal Election 2026: २० प्रभागांत जवळपास साडेपाच लाख मतदार आहेत.

प्रचाराचा सुपर संडे; मॉर्निंग वॉक, गाठीभेटी सुरू; जास्तीत जास्त मतदारांना गाठण्याचे प्रयत्न
Panvel Municipal Election 2026 लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : मतदानाला काही मोजके दिवस शिल्लक असल्याने अर्ज माघारी नंतर मिळालेला पहिल्या रविवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी 'सुपर संडे' म्हणून पायाला भिंगरी लावून जास्तीत जास्त मतदारांना गाठण्याचा प्रयत्न केला. सकाळी मॉर्निंग वॉकपासून योगा करण्यापर्यंत ते सायंकाळी उशिरापर्यंत सर्वच पक्षीय उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपापल्या पक्षाला मतदानाचे आवाहन केले.
रविवारी उद्धव सेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फोडून खारघर शहरात प्रचाराला सुरुवात केली तर सकाळी ८ वाजताच भाजपच्या उमेदवारांनी गार्डनमधील योगा तसेच व्यायाम करणाऱ्या मतदारांना गाठून प्रचार केला. सार्वजनिक ठिकाणी रॅली काढून बैठकांचे आयोजन केले जात होते. घरोघरी पत्रके वाढण्याचे कामही वेगाने सुरू होते. अनेक घरांत पती, पत्नी दोघेही नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे रविवारी जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला.
मातब्बरांमध्ये चुरशीची लढत
पनवेल शहरातत मातब्बर नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. कळंबोलीमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्साहात रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. खारघर शहरात भाजपच्या उमेदवारांनी सकाळी सेक्टर १० मधील गार्डनमध्ये उपस्थित नागरिकांसोबत योगा केला तर महाविकास आघाडीसह इतर उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या.