६६० मतदान केंद्रांसाठी पनवेलमध्ये ७२५ पथके सज्ज; अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:29 IST2026-01-08T15:13:06+5:302026-01-08T15:29:04+5:30
Panvel Municipal Election 2026: ५ ते ७ जानेवारीच्या दरम्यान द्वितीय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन

६६० मतदान केंद्रांसाठी पनवेलमध्ये ७२५ पथके सज्ज; अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण
Panvel Municipal Election 2026: पनवेल महापालिकेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक द्वितीय प्रशिक्षणास बुधवारपासून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरुवात झाली. २० प्रभागनिहाय क्षेत्राकरिता ६६० मतदान केंद्रे आहे. या केंद्रांकरिता ६ निवडणूक निर्णय अधिकारी, ६८ क्षेत्रीय अधिकारी, तसेच मतदान केंद्राध्यक्ष, साहाय्यक मतदान अधिकारी शिपाई आणि ६५ राखीव मतदान केंद्रांकरिता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके तयार करण्यात आली आहेत.
क्षेत्रीय अधिकारी, तसेच मतदान केंद्राध्यक्ष, साहाय्यक मतदान अधिकारी, शिपाई यांना महापालिका निवडणुकीतील कामांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता ५ ते ७ जानेवारीच्या दरम्यान द्वितीय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले होते.
मुख्य निवडणूक निरीक्षकांच प्रशिक्षणास भेट
मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे आणि निवडणूक निरीक्षक मनिषा कुंभा-यांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमवेत या प्रशिक्षणास भेट दिली.
कायदेशीर तरतुदी, टपाली मतदानाची माहिती
- निवडणुकीच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठीचे महत्त्वाचे अधिनियम, टपाली मतदान, मतदाराचे घोषणापत्र, प्रपत्र, कंट्रोल युनिटवरील संदेश व त्यांचा अर्थ, मतदान युनिट, मतदान युनिटची तपासणी, दुबारा मतदारांबाबत करावयाची प्रक्रिया, मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारीची माहिती दिली.
- मतदान बंद करावयाच्या वेळची कार्यपद्धती अशा निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवरील प्रशिक्षणा देण्यात येत आहे. निवडणूक प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा आहे. बुधवारी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली.