Panvel Municipal Election 2026: 65 टक्के मालमत्ता कर सवलत देणार, 'शेकाप-मविआ'चा बॉन्ड पेपरवर वादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:39 IST2026-01-10T20:38:17+5:302026-01-10T20:39:41+5:30
महापालिका निवडणुकीत वाढीव मालमत्ता कराबाबत महाविकास आघाडीने गॅरंटी कार्ड सादर केले. इतकंच नाही, तर शेकाप, महाविकास आघाडीने थेट 500 रुपयांच्या स्टॅम्पवर मतदारांसाठी शपथपत्र दिले आहे.

Panvel Municipal Election 2026: 65 टक्के मालमत्ता कर सवलत देणार, 'शेकाप-मविआ'चा बॉन्ड पेपरवर वादा
-वैभव गायकर, पनवेल
वाढीव मालमत्ता कर हा पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रचाराचा महत्वाचा मुद्दा बनला आहे. याच मुद्द्यावर आता महाविकास आघाडीने वाढीव मालमत्ता करात तब्बल 65 टक्के सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. शनिवारी (10 जानेवारी) कळंबोली येथे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीने 500 रुपयांच्या स्टॅम्पवर सर्व उमेदवार मतदारांना शपथपत्र सादर केल्याची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील, उद्धवसेनेच्या नेत्या लीना गरड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शेकाप नेते काशिनाथ पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिडको वसाहतीमधील मालमत्ता धारकांसोबत दुजाभाव करून सुमारे 65 टक्केची मालमत्ता कर सवलत नाकारून मोठ्या प्रमाणात मतदारांचे नुकसान करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास नव्याने कर रचना प्रणाली लागू करून साडेतीन लाख कर दात्यांना आम्ही दिलासा देऊ, असे लीना गरड यांनी सांगितले.
129 अ कलमा अंतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्राला त्याचा लाभ मिळेल त्या आधारावर नव्याने ठराव घेऊन नागरिकांना हा दिलासा देण्याचे काम आम्ही करू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे शपथपत्र
महापालिका हद्दीत 78 जागांवर उभे असलेले सर्व उमेदवार मतदारांना 500 च्या स्टॅम्पवर प्रचारादरम्यान शपथपत्र सादर करून नागरिकांना मालमत्ता कराबाबत दिलासा देण्याचे आश्वासन देत आहेत.