पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 21:15 IST2026-01-02T21:12:12+5:302026-01-02T21:15:26+5:30
Panvel Municipal Election Result 2026: भाजपाचे सहा तर एक अपक्ष विजयी

पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
Panvel Municipal Election Result 2026: महापालिका निवडणुकांच्या प्रचारसभांचे बिगुल वाजण्याआधीच राज्यात अनपेक्षित घटना घडल्या. राज्यभरातून विविध पद्धतीने महायुतीचे ५०हून अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले. कल्याण डोंबिवलीतून भाजपने खाते उघडले होते. त्यानंतर ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर पाठोपाठ पनवेल महापालिकेतही मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध विजयी झाले. पनवेल महानगरपालिकेत (Panvel Municipal Election 2026) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पनवेल महापालिका निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, भाजपचे ६ आणि १ अपक्ष उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात प्रभाग क्रमांक १८ (अ) मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन जयराम पाटील, प्रभाग क्रमांक १९ (अ) मधून दर्शना भगवान भोईर, प्रभाग क्रमांक १९ (ब) रूचिता गुरूनाथ लोंढे, प्रभाग क्रमांक २० (अ) अजय तुकाराम बहिरा, प्रभाग क्रमांक २० (ब) डॉ. प्रियंका तेजस कांडपिळे आणि प्रभाग क्रमांक १८ (क) मधून अपक्ष नगरसेवक स्नेहल स्वप्नील ढमाले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे-
१) नितीन पाटील
२) रुचिता लोंढे
३) अजय बहिरा
४) दर्शना भोईर
५) प्रियंका कांडपिळे
६) ममता प्रितम म्हात्रे
७) स्नेहल ढमाले
२०१७ मध्ये पनवेलमध्ये होती भाजपचीच सत्ता
पनवेल महापालिकेवर २०१७ साली भाजपची एक हाती सत्ता आली होती. महापालिकेत याआधी भाजपची एकहाती सत्ता होती. ७८ नगरसेविकांपैकी ५१ नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. यंदा शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची युती आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला इथे खातेही उघडता आले नाही. परंतु यावेळी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर सांगत आहेत. तसेच, पुन्हा भाजपचा महापौर बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.