उमेदवार उत्साहात, कर्मचारी उदासीन! पनवेलमध्ये निवडणूक प्रशिक्षणाला ७३० कर्मचाऱ्यांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:34 IST2026-01-01T14:30:00+5:302026-01-01T14:34:30+5:30
Panvel Municipal Corporation Election 2026: २४ तासात खुलासा करण्याच्या उपायुक्तांच्या सूचना

उमेदवार उत्साहात, कर्मचारी उदासीन! पनवेलमध्ये निवडणूक प्रशिक्षणाला ७३० कर्मचाऱ्यांची दांडी
Panvel Municipal Corporation Election 2026 | लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: महापालिका निवडणुकीचे कामकाज हाताळण्याच्या प्रशिक्षणाला तब्बल ७३० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना शेकडो कर्मचारी विनापरवाना गैरहजर राहिले. यामुळे पालिका प्रशासनाने निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिका निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. निवडणूक कामकाजासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येत आहेत. पनवेलमध्ये जवळपास ४,५०० हजार कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहणार आहेत. निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्या प्रशिक्षणास संबंधित कर्मचारी, शिक्षक आणि नियुक्ती केलेल्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी प्रशिक्षणास दांडी मारल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत २४ तासात खुलासा करण्याच्या सूचना उपायुक्तांनी केल्या आहेत.