महाविकास आघाडीला पनवेलमध्ये हवे एका प्रभागासाठी एकच चिन्ह ! उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:17 IST2025-12-27T10:16:58+5:302025-12-27T10:17:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : भाजपशी दोन हात करायचे असतील तर संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीची मोट बांधून एका प्रभागात ...

महाविकास आघाडीला पनवेलमध्ये हवे एका प्रभागासाठी एकच चिन्ह ! उमेदवारी यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : भाजपशी दोन हात करायचे असतील तर संपूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीची मोट बांधून एका प्रभागात एकच चिन्ह घेण्याची मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार पक्षश्रेष्ठींकडे करीत आहेत.
महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांचा समावेश आहे. एका पॅनलमध्ये चार वेगवेगळे चिन्ह नको, अशी मागणी हाेत आहे. विधानसभेत मविआमध्ये बिघाडी झाल्याने उद्धवसेना आणि शेकाप वेगवेगळे लढले. उद्धवसेनेच्या मशालीवर लीना गरड आणि शेकापने ‘शिट्टी’वर प्रचार केला.
बंडखाेरी भाजपच्या पथ्यावर
शेकापचे उमेदवार माजी आमदार बाळाराम पाटील यांना १ लाख ३२ हजार मते मिळाली. तर मशालीवर गरड यांना ४२ हजार मते मिळाली. महाविकास आघाडीतील बंडखोरी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पथ्यावर पडल्याने त्यांचा ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय झाला.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमत होत आहे. त्यामुळे एका पॅनलमध्ये चार किंवा तीन घटक पक्षाचे उमेदवार असल्यास वेगवेगळे चिन्ह न घेता काँग्रेसचा हात किंवा उद्धवसेनेची मशाल या चिन्हांची मागणी कार्यकर्ते करीत आहेत.
एका प्रभागात एकच चिन्ह असल्यास मविआमधील एकजूट कळेल तसेच कमी वेळात एक चिन्हांचा प्रचार करणे आणि मतदारांपर्यंत पोहचणे सहज शक्य होणार आहे.
स्वबळावर लढण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी!
भाजपने एका बाजूला आपला प्रचारही सुरू केला आहे. शिंदेसेनेला पाच पेक्षा जास्त जागा सोडण्यास भाजप तयार नसल्याने शिंदेसेना देखील स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी करीत आहे.
भाजपच्या कमळ चिन्हाचा प्रचार सुरू आहे. त्यातच विरोधक कुठे तरी मागे पडत असल्याने एका प्रभागात एका चिन्हाची मागणी हाेत आहे.
यादी जाहीर न झाल्याने इच्छुक प्रतीक्षेत
महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपल्या उमेदवारांच्या याद्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. बंडखोरी टाळण्यासाठी दोघांनीही इच्छुकांना वेटिंगवर ठेवले आहे. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचणे अवघड होणार आहे.
विधानसभेत शेकापला शिट्टी या चिन्हावर १ लाख ३२ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे मित्रपक्षाचे चिन्ह घेण्याचा विचार अद्याप तरी नाही. निवडणूक आयोगाकडून जे चिन्ह प्राप्त होईल, त्या चिन्हांवर शेकाप निवडणूक लढेल.
बाळाराम पाटील, अध्यक्ष,
महाविकास आघाडी, पनवेल