हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन: हभप अनिल महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:13 IST2023-12-20T16:12:08+5:302023-12-20T16:13:38+5:30
अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात दिवस अखंड हरिनाम साजरा करण्यात आला.

हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन: हभप अनिल महाराज
मधुकर ठाकूर, उरण : 'हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन असून प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण केल्याशिवाय फळप्राप्ती होत नाही. सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावे लागते तसेच भगवंताची भक्ती होत असताना अनेक अडथळे येत असतात. मात्र भगवंताच्या नामस्मरणाने फळप्राप्ती होते,' असा उपदेश हभप अनिल महाराज यांनी कीर्तनातून केला.
चिरनेर कातळपाडा येथील दत्त जयंती उत्सव सोहळा निमित्ताने सद्गुरु माऊली हसुरामबाबा आणि तसेच गुरुकुलच्या सहकार्याने हभप गजानन महाराज, हभप चिदानंद महाराज, हभप मदन महाराज व दात्यांच्या सहकार्याने व्यासपीठ चालक गुरुवर्य हभप अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात दिवस अखंड हरिनाम साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.दरवर्षीप्रमाणे सप्ताहाच्या सातव्या दिवशी दीपोत्सवाच्या माध्यमातून सप्ताहाची सांगता करण्यात आली. या अखंड हरिनाम सप्ताहात भजन, कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले होते.
मंगळवारी सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी नामदेव भगत, चंद्रकांत गोंधळी, हभप अनिल महाराज, हभप दत्तात्रेय महाराज, हभप विश्वास महाराज, हभप हसुराम म्हात्रे, हभप रमेश महाराज, हभप वसंत महाराज, हभप कृष्णा म्हात्रे, हभप मारुती महाराज, हभप हरिश्चंद्र गोंधळी, हभप समीर गोंधळी, तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व वारकऱ्यांनी तसेच थोर कीर्तनकारांनी दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला.