उरण परिसरात अवकाळी पाऊसाने शेतकरी, वीटभट्टी उत्पादक धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:00 IST2024-01-10T18:00:12+5:302024-01-10T18:00:25+5:30
उरण परिसरातील काही ठिकाणी मंगळवारी (९) रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली.

उरण परिसरात अवकाळी पाऊसाने शेतकरी, वीटभट्टी उत्पादक धास्तावले
मधुकर ठाकूर
उरण: उरण परिसरात मंगळवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी वर्गाबरोबर आंबा बागायतदार वीटभट्टी उत्पादक धास्तावले आहेत. उरण परिसरातील काही ठिकाणी मंगळवारी (९) रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात बदल झाला. या परिसरात मागील चार-पाच दिवस ढगाळ वातावरण दिसून येत होते. अखेर मंगळवारी रात्री हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. अचानक पाऊस आल्यामुळे वीट भट्टी व्यवसायिक चिंतेत आहेत.
दरम्यान आंब्याच्या झाडांना आता कुठे मोहोर लागण्यास सुरुवात झाली आहे. मोहोर बाहेर पडून फुललेल्या मोहरावर पाऊस पडल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच येथील रब्बी हंगामातील वाल, चवळी, मूग, हरभरा आदी कडधान्य पिकांनाही हा पाऊस हानिकारक ठरू शकतो. असे येथील कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, गोपीनाथ गोंधळी, अनिल केणी, अरुण केणी,कल्पेश म्हात्रे हरिश्चंद्र गोंधळी यांनी सांगितले. त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे मळे या पावसामुळे धोक्यात आले असून, या भाजीपाल्यावरही अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी कृष्णा म्हात्रे यांनी सांगितले. याशिवाय पशुपालक शेतकऱ्यांनी गुरांसाठी राखून ठेवलेला सुकाचारा (पेंढा) भिजून गेला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी सुरज घरत यांच्याशी संवाद साधला असता तालुक्यात कोणत्याही प्रकारचे फारसे नुकसान झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे अजूनपर्यंत आली नसल्याचे त्यांनी सांगितले.