युती-आघाडीसाठी संपर्क; आदेश मिळताच भरणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:48 IST2025-12-26T09:48:26+5:302025-12-26T09:48:42+5:30
अद्याप महायुतीसह आघाडीचा तिढा सुटलेला नसल्याने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्र तयार ठेवली असली तरी त्यांना नेत्यांचे आदेश नाहीत.

युती-आघाडीसाठी संपर्क; आदेश मिळताच भरणार अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी शेकडो उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, अद्याप महायुतीसह आघाडीचा तिढा सुटलेला नसल्याने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्र तयार ठेवली असली तरी त्यांना नेत्यांचे आदेश नाहीत. ते मिळताच उमेदवार अर्ज भरणार आहेत.
अद्याप थेट सूचना नाहीत
भाजपने बहुतेक आपले उमेदवार निश्चित केले आहेत. त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचनादेखील काहींना करण्यात आल्या आहेत. मात्र, मित्रपक्षासोबत युती झाल्यास भाजपला काही जागा सोडाव्या लागू शकतात. त्यामुळे अद्याप तरी भाजपने थेट सूचना इच्छुकांना केलेल्या नाहीत. वरिष्ठांच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
आठ माजी नगरसेवकांचा पत्ता होणार कट
दरम्यान, भाजपमधील किमान सात ते आठ नगरसेवकांचे तिकीट कट केले जाणार असल्याने ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
शिंदेसेनेला शुक्रवारची मुदत
शिंदेसेनेला भाजपने २६ रोजीची मुदत मागितली आहे. भाजप शुक्रवारी शिंदेसेनेला अंतिम किती जागा सोडते, हे स्पष्टपणे सूचित करणार आहे.
उद्धवसेनेत संघर्ष
महाविकास आघाडीत उद्धवसेना नेते बबन पाटील घरातील दोन तिकिटांसाठी आग्रही असल्याने शेकाप, काँग्रेसमधील नेत्यांची चिंता यामुळे वाढली आहे. या दोन जगांवर उद्धवसेनेमधूनच बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
शेकापशी संपर्काची चर्चा
भाजपविरोधात लढण्यासाठी शिंदेसेनेचे हे नेते शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्याशीदेखील संपर्क साधत असल्याची चर्चा आहे.