जेएनपीए राष्ट्रीय महामार्गावर काळ्या ऑईलचे कंटेनर पलटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 19:40 IST2023-12-28T19:39:42+5:302023-12-28T19:40:15+5:30
निसरड्या रस्त्यामुळे वाहतूक दोन तास ठप्प.

जेएनपीए राष्ट्रीय महामार्गावर काळ्या ऑईलचे कंटेनर पलटी
मधुकर ठाकूर, उरण : जेएनपीए ते पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर डांबर ऑईलचा साठा असलेला कार्गो कंटेनर गुरुवारी चिर्ले येथील रस्त्यावर पलटी झाला.त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे सुमारे एक-दिड किमी अंतरापर्यंतचा रस्ता पार निसरडा झाल्याने या मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळविण्यात आली होती.
गुरुवारी (२८) सकाळच्या सुमारास रस्त्याच्या डांबरीकरण करण्यासाठी लागणाऱ्या काळ्या ऑईलचे ड्रम भरलेला कंटेनर चिर्ले येथील रस्त्यावर पलटी झाला.ड्रममधील ऑईल रस्त्यावर सांडले. वाहनांच्या वर्दळीमुळे टायरला लागुन सुमारे एक-दिड किमी अंतरापर्यंत पोहचल्याने रस्ता पार निसरडा झाला.निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे मात्र या मार्गावरील वाहतूक चांगलीच धोकादायक झाली होती.याचा अंदाज आल्याने उरण वाहतूक नियंत्रण विभागाचे पीएसआय संजय पवार यांनी लागलीच या मार्गावरील वाहतूक बंद करून सर्व्हिस रोडवरून वळवली.तेथेच काम करीत असलेल्या ठेकेदारांला हाताशी धरून निसरड्या झालेल्या रस्त्यावर डंपरने सुकी माती टाकून रस्ताही कोरडा करून घेतला.
त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने स्त्यावर टाकलेली मातीही ठेकेदाराकडून काढून टाकली.रस्ता वाहतूकीसाठी सुरक्षित झाल्यानंतर दोन तासांनी या मार्गावरील बंद करण्यात आलेली वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली.या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पीएसआय संजय पवार यांनी दिली.