PMC Elections : आरक्षण सोडतीत ‘कही खुशी कही गम’;अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडताच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:03 IST2025-11-12T13:58:51+5:302025-11-12T14:03:11+5:30
आपल्याला अनुकूल असलेला प्रभाग आणि हवे तसे आरक्षण पडावे, म्हणून देवाला साकडे घालून बसलेले माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी केली होती.

PMC Elections : आरक्षण सोडतीत ‘कही खुशी कही गम’;अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडताच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जल्लोष
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या प्रारूप आरक्षण सोडतीत अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी ‘गणपतीबाप्पा मोरया’ अशा घोषणा देऊन जल्लोष केला. आरक्षण सोडत निघताच काही इच्छुकांनी पेढे वाटप करत आनंद साजरा केला. मात्र, आरक्षण सोडत मनाप्रमाणे न पडल्यामुळे काही इच्छुकांच्या गोटात नाराजीचे चित्र होते. त्यामुळे प्रारूप आरक्षण सोडतीत ‘कही खुशी, कहीं गम’ असेच वातावरण पाहायला मिळाले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षणाची सोडत मंगळवारी जाहीर झाली. आपल्याला अनुकूल असलेला प्रभाग आणि हवे तसे आरक्षण पडावे, म्हणून देवाला साकडे घालून बसलेले माजी नगरसेवक आणि इच्छुकांनी कार्यकर्त्यांसह मोठी गर्दी केली होती. सोडतीच्या वेळेस गर्दी होईल, असा अंदाज असल्याने गणेश कला क्रीडा मंदिर परिसरात एकूण चार स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. सोडतीच्या सुरुवातीलाच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर ओबीसी, सर्वसाधारण गटाचे प्रभाग जाहीर करण्यात आले.
प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते घोळक्याने थांबून राजकीय आखाडे बांधण्यात दंग झाले होते. जे माजी नगरसेवक सोडतीच्या वेळेस उपस्थित होते, त्यांना कार्यकर्ते ‘भाऊ, काय झाले?...’ ‘दादा, काय झाले?...’ ‘तुमची निवडणूक कोणाविरोधात?...’ अशी उत्सुकतेने विचारणा करत होते. तर, काहीजण मोबाइलवरून आपल्या प्रभागातील माजी नगरसेवक आणि इच्छुकांचे काय झाले, याची माहिती देत होते. मनासारखे आरक्षण न मिळालेल्या इच्छुकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंग झाल्याने ते मान खाली घालूनच बाहेर पडले. मात्र, लॉटरी लागलेले इच्छुक कार्यकर्तेबरोबर हास्य करीत आनंदात बाहेर पडले. ‘साहेब, आता फक्त आरक्षण मिळाले... अजून उमेदवारी मिळायची आहे. तो अमुक-तमुकही वाटेत आहेच की अशी आठवण एखादा कार्यकर्ता करून देतानाच ‘साहेब’ त्याला आणखी जोराने दटावत होते.
शाळकरी मुलांनी बसवले घरी
गणेश कला क्रीडा रंगमंदिरात आरक्षणाची सोडत काढण्यासाठी पालिका शाळेतील मुला-मुलींना बोलावण्यात आले होते. त्यांच्या हस्ते समोरील पेटीतून आरक्षित प्रभागांचे क्रमांक काढले जात होते आणि अधिकारी ते जाहीर करत होते. लहान-लहान शाळकरी मुला-मुलींनी नगरसेवकांना घरी बसवले... हीच खरी लोकशाही, अशीही गंमतीदार प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करीत होते.
व्हॉट्सॲपवर मॅसेज अन् फोनाफोनी...
आरक्षण सोडतीच्या माहितीचे मेसेज आणि स्क्रिनवरील चार्ट व्हॉट्सॲपवरून देण्यात कार्यकर्ते मग्न होते. आरक्षण जाहीर होताच या माहितीचे मॅसेज व्हॉट्सॲपवर पडत होते. प्रभागाच्या आरक्षण सोडतीला अनेक माजी नगरसेवक आले नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांना फोन करून ते माहिती घेत होते.