जेजुरीच्या राजकारणात भूकंप..! जयदीप बारभाई राष्ट्रवादीत; शरद पवार गटाचा मोठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:39 IST2025-11-13T13:38:53+5:302025-11-13T13:39:45+5:30
- प्रवेशाने राजकीय समीकरणे उलथली; महायुती-आघाडीच्या गोंधळात ‘घड्याळा’चा फटका बसला जोरात

जेजुरीच्या राजकारणात भूकंप..! जयदीप बारभाई राष्ट्रवादीत; शरद पवार गटाचा मोठा झटका
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा धडाका लावला आहे. बुधवारीही मुलाखती सुरू होत्या. त्यातच जेजुरीतील शरद पवार गटाचे जयदीप बारभाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जेजुरीच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. दुसरीकडे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत यापूर्वीच माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये दाखल झाले असल्याने आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी चुरशीची लढत जेजुरीत पाहायला मिळणार आहे.
नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुती, महाविकास आघाडी म्हणून लढायचे की नाही यावर अजूनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा धडाका लावला आहे. बुधवारीही पुण्यातील कार्यालयात मुलाखती आणि बैठका पार पडल्या.
यावेळी भोर, राजगड, मुळशी, पुरंदर आणि जेजुरी येथील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची भेट घेत नागरी समस्यांवर चर्चा केली. दरम्यान, जेजुरी आणि सासवडमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला कोणत्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला हे संदिग्ध होते. मात्र, दुपारनंतर जेजुरीमधील जयदीप बारभाई यांच्यासह शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. या प्रवेशामुळे जेजुरीच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला.
तब्बल ३० ते ३५ वर्षे दिलीप बारभाई यांनी नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर माजी आमदार संजय जगताप यांनी बारभाई यांची सत्ता खालसा केली होती. सध्या दिलीप बारभाई यांचे पुत्र जयदीप बारभाई यांनी जेजुरी नगराध्यक्ष पदावर दावा केला होता. त्यानंतर शरद पवार गट-अजित पवार गटाने एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र, आता जयदीप बारभाई यांच्यासह कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्याने महायुतीतील गोंधळात आणखी भर पडली आहे.
एकत्रित लढण्याचा प्रस्ताव फेटाळला
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रित लढण्याचा निर्णय झाला होता. त्याच पद्धतीने जेजुरीतही निवडणूक लढविण्याचा अप्रत्यक्षपणे काही पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. तसा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे जेजुरी आणि सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अत्यंत कमी आहे. जेजुरीमध्ये बारभाई कुटुंबीयाचा राजकीय प्रभाव अधिक असून, संजय जगताप यांची सत्ता खालसा करण्यासाठी एकत्रित लढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शरद पवार गटापुढे नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान, अप्रत्यक्षपणे एकत्रित लढण्याचा मांडण्यात आलेला प्रस्ताव अजित पवार यांनी फेटाळून लावत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असाल तर आपले स्वागत असल्याची भूमिका घेतली. त्यानंतर जयदीप बारभाई आणि शरद पवार गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हातावर घड्याळ बांधले.
दोन्ही पक्ष एकत्र येणार नाहीत : कोलते
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष कधीही एकत्रित निवडणुका लढविणार नाहीत. बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही आमच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. जेजुरीमधील बारभाई आणि पवार कुटुंबीयांचे जुने ऋणानुबंध आहेत. अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव आला होता. मात्र, सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. दरम्यान, महाविकास आघाडीची मुंबई बैठक झाली. त्यामध्ये महाविकास आघाडीत असणाऱ्या पक्षांनी स्थानिक निवडणुकीत मित्र पक्षांचीच युती करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येणार यात तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव राष्ट्रवादीत
अनेक विकासकामे प्रलंबित असून, जेजुरीकरांना न्याय देणे क्रमप्राप्त आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचा काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा आग्रह होता. शरद पवार, अजित पवार यांचे आणि बारभाई कुटुंबीयांचे ऋणानुबंध सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे जयदीप बारभाई यांनी सांगितले.