PMC Election Results 2026 : पुणे महापालिकेचा महापौर कोण? आज आरक्षण सोडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:36 IST2026-01-22T12:35:42+5:302026-01-22T12:36:16+5:30
महापौर भाजपचा होणार आहे; पण महापौरपदाची आरक्षण सोडत अद्याप काढण्यात आलेली नाही

PMC Election Results 2026 : पुणे महापालिकेचा महापौर कोण? आज आरक्षण सोडत
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे; पण महापौरपदाची आरक्षण सोडत अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतरच महापौरापदाचे नाव निश्चित होणार आहे. आज (गुरुवारी) महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पण, महापौरपदाचे आरक्षण सोडत अद्याप निघालेली नाही. त्यामुळे महापौरपदाची आरक्षण सोडत कधी निघणार, याकडे निवडून आलेल्या सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीमधील सहा मजल्यावर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या २०१२ आणि २०१७ या निवडणुकांच्या वेळी महापौरपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण होते. त्यामुळे अनेकांना महापौर होण्याची संधी होती. पुणे महापालिकेत गेली अनेक वर्षे महापौरपदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषाचे आरक्षण निघालेले नाही. त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे. ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यास माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि धीरज घाटे या दोघांपैकी एकाची महापौरपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.