PMC Elections : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून तुतारी गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 23:10 IST2025-12-30T23:08:39+5:302025-12-30T23:10:02+5:30
- विधानसभा निवडणुकीत आठ आमदारांमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) एकमेव आमदार म्हणून निवडून आले आहेत.

PMC Elections : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून तुतारी गायब
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. पण वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात २४ नगरसेवकांच्या जागा आहेत. त्यापैकी एकाही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं, त्या पक्षाची निशाणीच आपल्या हक्काच्या प्रभागातून गायब करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहरातील एकमेव आमदार बापू पठारे यांनी केले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीत आठ आमदारांमध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) एकमेव आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात २४ नगरसेवकांच्या जागा आहेत. त्यापैकी एकाही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा उमेदवार नाही. मात्र बापू पठारे यांच्या सूनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांना प्रभाग ३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर पठारेंचे भाचे संतोष भरणे यांच्या पत्नी तृप्ती भरणे यांना आणि सुरेंद्र पठारे यांना उमेदवारी दिली आहे.
बापू पठारे हे कोणाचा प्रचार करणार?
भाजपचे नेते, आमदार पक्षवाढीसाठी आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे पुण्यातील एकमेव आमदार असलेले बापूसाहेब पठारे यांच्या मतदारसंघातून पक्षचिन्ह तुतारीच गायब झाल्याचे चित्र आहे. आता बापू पठारे हे कोणाचा प्रचार करणार हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.