PMC Election Results 2026: महात्मा फुले इथे नगरसेवक होते, हा वारसा कधीच विसरू नका..!

By संजय आवटे | Updated: January 17, 2026 15:23 IST2026-01-17T15:22:10+5:302026-01-17T15:23:34+5:30

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत गिरिजा ओक-गोडबोले यांनी घेतली.

PMC Election Results 2026 Mahatma Phule was a corporator here, never forget this legacy | PMC Election Results 2026: महात्मा फुले इथे नगरसेवक होते, हा वारसा कधीच विसरू नका..!

PMC Election Results 2026: महात्मा फुले इथे नगरसेवक होते, हा वारसा कधीच विसरू नका..!

- संजय आवटे
संपादक, लोकमत

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पक्षाने पुन्हा काबीज केल्या आहेत. दोन्ही महानगरपालिकांमध्ये त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आघाडीची अपरिहार्यता असणार नाही. जे करायचे आहे, त्यापासून कोणी रोखणार नाही.

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत गिरिजा ओक-गोडबोले यांनी घेतली. त्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे ‘पुण्याचे व्हिजन’ स्पष्ट केले. ही दोन्ही महानगरे किती महत्त्वाची आहेत, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस नेहमीच मांडणी करत असतात. महापौर ते मुख्यमंत्री, असा प्रवास करणारे मनोहर जोशींनंतरचे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री. शहर नियोजन हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे हे नंतर ‘आयटी हब’ झाले. येणाऱ्या काळात ‘जीसीसी’ अर्थात ‘ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर’चे ते केंद्र होणार आहे. या नव्या पुण्याच्या विकासाबद्दल मुख्यमंत्री बोलत होते. पुण्याविषयी फडणवीसांना आस्था आहे. ते वारंवार तसा उल्लेख करत असतात. लोकसभा निवडणूकच ते पुण्यातून लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, ‘निवडणूक नागपुरातून लढवणार; पण पुण्यावरचे प्रेम कायम ठेवणार’, अशी भूमिका ते मांडत असतात. या निवडणुकीच्या काळातही पुण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. समारोपाची सभाही त्यांनी पुण्यात घेतली. आता त्यांना हवा तसा निकाल पुणेकरांनी दिला आहे. हवा तसा कौल मिळाला आहे.

पुणेकरांना नेहमीच खूप स्वप्नं दाखवली जातात. त्यांचे फार कौतुकही केले जाते. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही शहरांची स्थिती झपाट्याने बिकट होऊ लागली आहे. साध्या पावसाने पुणे पाण्यात जावे, अशी वेळ येऊन ठेपली आहे. केंद्रीय मंत्री एकीकडे उडणाऱ्या बसचे स्वप्न दाखवत असताना, पुणेकर मात्र बुडणारी बस बघत होते. अगदी पावसाळ्यातसुद्धा पुणेकरांना, पिंपरी-चिंचवडकरांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. वाहतुकीची कोंडी प्रचंड आहे. आज बांधलेला उड्डाणपूल कधी पाडला जाईल, हे सांगणे कठीण आहे. मुळा-मुठा-पवना-इंद्रायणी या नद्या मरणासन्न आहेत. एवढे असूनही, पुण्याकडे आणि पिंपरी-चिंचवडकडे कोणाचेही लक्ष नाही. एकेकाळी आशिया खंडात श्रीमंत मानली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आता मात्र बापडी झाली आहे. विकासाच्या नावाखाली जे काही सुरू आहे, त्यामुळे ही शहरे अधिकच बकाल झाली आहेत. नवे रोजगार येणे तर दूरच, आहेत ते रोजगार निघून चालले आहेत. दोन्ही शहरांमध्ये पंचतारांकित रुग्णालये उभी आहेत, मात्र सर्वसामान्य माणसांनी जिथे सहजपणे जावे, असे सार्वजनिक दवाखाने ओस पडू लागले आहेत. महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था तेवढीच भयंकर आहे. हे चित्र बदलले नाही, तर येणारा काळ फारच वाईट असणार आहे !

मतदारांनी मोठ्या विश्वासाने भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. मोठा वारसा असणारी अशी ही शहरे आहेत. इथले वातावरण छान आहे. निसर्गाने भरभरून दिले आहे. विचार करणारी माणसे या शहरांमध्ये आहेत. या शहरांना सांस्कृतिक चेहरा आहे. चळवळींचे अधिष्ठान आहे.

राजमाता जिजाऊंनी इथेच छत्रपती शिवरायांना घडवले. इथेच शंभूराजांनी पराक्रमाची शर्थ केली. याच परिसरात संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या विश्वासाठी पसायदान मागितले. इथल्याच इंद्रायणीने तुकारामांची गाथा तारली. लोकमान्य टिळकांनी पुण्यातूनच संपूर्ण भारताचे नेतृत्व केले. आगरकरांनी याच पुण्यातून सर्वसामान्य माणसांना विचारकलहासाठी सिद्ध केले. इथेच मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि साहित्य संमेलनाची सुरुवातही इथेच झाली. हा मोठा वारसा या परिसराला आहे. मात्र, आज या शहरांची स्थिती बिकट आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए यांचा एकत्रित विकास करण्यासाठी दृष्टीची आवश्यकता आहे. धडाकेबाज पद्धतीने कामे होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. मात्र, जेव्हा मूठभर ठेकेदार महानगरपालिकाच ताब्यात घेऊन टाकतात, तेव्हा काय करायचे? कोणत्याही एका व्यक्तीच्या ताब्यात महानगरपालिका जाता कामा नये. ती लोकांची असली पाहिजे. लोकांच्या विकासासाठी महानगरपालिकेने प्रयत्नांची शर्थ केली पाहिजे.

नऊ वर्षांनंतर पुण्यात महानगरपालिकेची निवडणूक झाली. गेली चार वर्षे नगरसेवक नव्हते. सर्वसाधारण सभा नव्हत्या. प्रशासकांच्या हातात सत्तेची सगळी सूत्रे होती. आता मात्र चर्चा, वादविवाद, संवाद यामुळे महानगरपालिका पुन्हा गजबजून जाईल. नगरसेवक आपला मुद्दा जोरकसपणे मांडतील. चांगल्या चर्चा घडतील. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांच्या विकासासाठी दमदार पावले पडतील. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आता केंद्रात मंत्री आहेत. चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ राज्यात मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे, पक्षात चंद्रकांतदादा आहेत, तर सरकारमध्ये अजित पवार 'दादा' आहेत. या सगळ्यांना पुण्याची किती चिंता आहे, ते येणारा काळ सांगेलच !

पुणेकर शहाणे आहेत. त्यांनी एकहाती सत्ता दिली आहे. ही केवळ सत्ता नाही, जबाबदारीसुद्धा आहे. ती जबाबदारी नव्या कारभाऱ्यांना नाकारता येणार नाही. विरोधकांनाही आपल्या हातातील अंकुश सोडता येणार नाही. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेली युती मतदारांना तत्त्वशून्य वाटली असावी. त्यामुळे काका-पुतण्याला, दादा-ताईला पुणेकरांनी नाकारले असावे. या युतीला विरोध करत, मूल्यांसाठी जे उभे ठाकले, त्या प्रशांत जगताप यांना मात्र मतदारांनी निवडून दिले!

आता निवडणूक झाली आहे. सारे मतभेद आणि रागलोभ विसरून सर्व पक्षांनी पुण्याच्या विकासासाठी सजग राहिले पाहिजे. प्रशासक परवडले, पण नगरसेवक नकोत, असे म्हणण्याची वेळ लोकांवर येऊ नये! पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पुणे पालिकेमध्ये साक्षात महात्मा फुले नगरसेवक होते. हा आपला वारसा आहे ..! 

Web Title : पीएमसी चुनाव 2026: महात्मा फुले की विरासत को याद रखें!

Web Summary : भाजपा ने पुणे और पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाएं फिर से जीतीं। विकास के बावजूद, शहरों में पानी की कमी और यातायात जैसी समस्याएं हैं। नागरिकों को महात्मा फुले की विरासत को याद रखते हुए बेहतर शासन की उम्मीद है। सभी दलों को शहर के विकास को प्राथमिकता देनी चाहिए।

Web Title : PMC Election 2026: Remember Mahatma Phule's Legacy as a Councillor!

Web Summary : BJP regained Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporations. Despite development, cities face issues like water scarcity and traffic. Citizens expect better governance, remembering Mahatma Phule's legacy of public service. All parties should prioritize city development.