PMC Election 2026: शिवसेनेचा अंतर्गत वाद; उमेदवाराने चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला, पुण्यातील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:59 IST2025-12-31T14:58:19+5:302025-12-31T14:59:06+5:30
PMC Election 2026 एकाच प्रभागात दोघांना AB फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी एका उमेदवाराने दुसऱ्याचा फॉर्म हिसकावून घेऊन तो फाडून गिळून टाकला

PMC Election 2026: शिवसेनेचा अंतर्गत वाद; उमेदवाराने चक्क एबी फॉर्मच खाऊन टाकला, पुण्यातील खळबळजनक घटना
धनकवडी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत मागील दोन दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये उमेदवारीवरून राजकीय रणधुमाळी चिघळली असून शिवसेने शिंदे गटाचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाकडून देण्यात आलेला AB फॉर्म शिवसेनेच्या उद्धव कांबळे यांनी चक्क खाऊन टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
एकाच प्रभागात दोन उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर मच्छिंद्र ढवळे यांचा AB फॉर्म हिसकावून घेऊन तो फाडून गिळून टाकला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा धोक्यात आली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. कायदा सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, उमेदवारी वाटपातील गोंधळ आणि अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. प्रभाग 36 (अ) मधील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.