PMC Election 2026: ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:38 IST2026-01-08T15:37:24+5:302026-01-08T15:38:19+5:30
PMC Election 2026 निवडणूक म्हणजे संविधानाने सामान्य जनतेला दिलेले आपले म्हणणे मांडण्याच्या एक अधिकार असतो, बालेवाडीतील काही नागरिकांचे हेच म्हणणे त्यांनी बॅनरच्या माध्यमातून समोर आणले आहे

PMC Election 2026: ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’, बॅनरच्या माध्यमातून पुण्यातील रहिवाशांची लक्षवेधी भूमिका
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात उमेदवार सोसायटया आणि घरांना भेटी देत आहेत. तसेच त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत? कोणत्या समस्या आहेत? काही अडचणी आहेत का? याबाबत ते जाणून घेत आहेत. तसेच आम्हाला निवडून दिल्यास समस्या सोडवण्याची आश्वासने उमेदवारांकडून दिली जात आहेत. अशातच पुण्यातील बाणेरबालेवाडी परिसरातून नागरिकांची लक्षवेधी भूमिका समोर आली आहे.
बालेवाडी येथील ‘साई सिलिकॉन व्हॅली’ सोसायटीच्या प्रवेशद्वारावर ‘आमचं मत वाइन शॉप हटविणाऱ्याला’ असे बॅनर लावून रहिवाशांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. या बॅनरमुळे संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक म्हणजे संविधानाने सामान्य जनतेला दिलेले आपले म्हणणे मांडण्याच्या एक अधिकार असतो. बालेवाडीतील काही नागरिकांचे हेच म्हणणे त्यांनी बॅनरच्या माध्यमातून समोर आणले आहे. तुम्हाला मत हवे असेल दारूचे दुकान हटवा अशी या नागरिकांची मागणी आहे.
महापालिका निवडणूक तब्बल ८ वर्षांनी होती आहे. इतके वर्ष नगरसेवक नसल्याने लोकांना समस्या घेऊन कुठेही जाता येत नव्हते. आता नागरिकांना एका प्रभागाला ४ नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनाही आपल्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बरेच नागरिक आतापासूनच उमेदवारांसमोर आपल्या भूमिका मांडताना दिसून येत आहेत. त्यामध्ये आता सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ‘साई सिलिकॉन व्हॅली’ सोसायटीबाहेर लावलेले हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये अनेक नेटकऱ्यांनी या बॅनरबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या बॅनरबाबत प्रशासन काही विचार करेल का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.