PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) ११०, तर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) १८ जागांवर लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:45 IST2025-12-30T13:44:29+5:302025-12-30T13:45:04+5:30
PCMC Election 2026 दोन्ही गटांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये यासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, एकत्र लढून शहरातील सत्तेत येणे, हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) ११०, तर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) १८ जागांवर लढणार
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी सोमवारी जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला.
या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) १८ जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित ११० जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार)कडून उमेदवारी देण्यात येणार आहे. दोन्ही गटांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये यासंदर्भात सकारात्मक वातावरण असून, एकत्र लढून शहरातील सत्तेत येणे, हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक ९ आणि २० मध्ये दोन्ही गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या प्रभागांमध्ये स्थानिक समीकरणे, इच्छुकांची संख्या आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेऊन स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, इतर प्रभागांमध्ये उमेदवार निवड, प्रभागनिहाय आढावा आणि प्रचारयंत्रणेची आखणी सुरू आहे. दोन्ही गटांच्या संयुक्त बैठका, स्थानिक नेत्यांशी चर्चा आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आज मंगळवारी (दि.३०) अंतिम यादी जाहीर होणार असून, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीला (शरद पवार) १८ जागा देण्यात येणार आहेत. प्रभाग ९ आणि २० मध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचे ठरले आहे. - योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार)
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. कोणाला किती जागा याबाबत खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हेच ठरवतील. - तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार)