सर्वांना सुबुद्धी, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणराया चरणी प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:34 IST2025-09-02T11:34:24+5:302025-09-02T11:34:41+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन

सर्वांना सुबुद्धी, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गणराया चरणी प्रार्थना
पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे सोमवारी (दि. १) उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. सर्वांना सुबुद्धी देवो, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणराया चरणी केली.
गौरी पूजनासाठी सुट्टी दिली असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र, मुख्यमंत्री दर्शनासाठी येणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असल्यामुळे त्यांचा ताफा मंदिर परिसरात दाखल झाल्यावर भाविकांना काही वेळ दर्शनासाठी थांबविण्यात आले. ताफा पुढे गेल्यानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली. यामुळे काही क्षण भाविकांना अडचण जाणवली असली तरी नंतर दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू झाली. मुख्यमंत्री यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा विविध मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या गणपती मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, साने गुरुजी तरुण मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासने, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मंडळांचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंडळातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळांनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेतली.
पुण्यातील मानाचे गणपती हा राज्यातील एक सन्मानाचा विषय आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. गणपतीने सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस