"वडिलांकडून निष्ठा काय असते शिकायलं हवं"; शरद पवारांनी चेतन तुपेंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:08 IST2024-11-18T15:53:18+5:302024-11-18T16:08:02+5:30
शरद पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे यांच्यावर टीका केली आहे.

"वडिलांकडून निष्ठा काय असते शिकायलं हवं"; शरद पवारांनी चेतन तुपेंना सुनावलं
Sharad Pawar Slam Chetan Tupe : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार हे प्रचारासाठी फिरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शरद पवार हे राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांवर टीका करत आहे. पुण्यातल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यावरही शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. आमदार चेतन तुपे आणि शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशातच शरद पवार यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून चेतन तुपेंवर निशाणा साधला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रामुख्याने लढत होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. २०१९ मध्ये येथून राष्ट्रवादीचे चेतन तुपे विजयी झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर चेतन तुपे अजित पवारांच्या गटात गेले होते.
त्यानंतर आता प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शरद पवार यांनी एक्स अकाउंटवरुन चेतन तुपेंवर निशाणा साधला आहे."प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही. चेतन तुपेंने मात्र फुटीरांना साथ दिली. वडिल विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते?' हे त्यांनी शिकायला हवे होते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
प्रशांत जगताप यांनी अडचणीच्या वेळी पक्ष निष्ठा सोडली नाही . चेतन तुपेंने मात्र फुटीरांना साथ दिली. वडिल विठ्ठल तुपे यांच्याकडून ‘निष्ठा काय असते ?’ हे त्यांनी शिकायला हवे होते .
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 18, 2024
दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या या टीकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच शरद पवार यांनी केलेल्या टीकेला चेतन तुपे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.