मारूती मंदिरातील गणरायाला आवड जिलब्यांची! मंडईतील जिलब्या गणपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:58 IST2022-08-29T12:58:23+5:302022-08-29T12:58:35+5:30
जिलब्या मारूती मंडळाची मूर्ती ही खूप सुंदर आणि रेखीव आहे

मारूती मंदिरातील गणरायाला आवड जिलब्यांची! मंडईतील जिलब्या गणपती
पुणे : शनिपारकडून मंडईकडे जायला लागलो की, वाटेत दिसते ते मारूती मंदिर. या भागात एक हलवाईचे दुकान होते. तो हलवाई नेहमी जिलब्यांचा हार मारूतीला अर्पण करायचा. त्यावरून येथील मारूतीला जिलब्या असे म्हटले जाते. या मंदिरातील मंडळाच्या गणरायाला आजही गणेशोत्सवात जिलब्यांचा नैवैद्य दाखविण्यात येतो.
जिलब्या मारूती मंडळ हे शहराच्या मध्यभागी असलेले एक नावाजलेले मंडळ आहे. पुणे शहरातील प्रमुख मंडळांत जिलब्या गणपतीची गणना होते. या मंडळाची स्थापना १९५४ साली झाली. तुळशीबाग, महात्मा फुले मंडई व शनिपारसारखी महत्त्वाची ठिकाणं येथून आजुबाजूला आहेत. मंडळ एका छोट्या मारूती मंदिरावरून ओळखले जाते. या मारूतीला तिथला एक मिठाईवाला दररोज पहिल्या जिलब्यांचा प्रसाद म्हणून हार घालायचा, म्हणून नाव पडले ‘जिलब्या मारूती’. त्यामुळे या मारूतीवरून गणपती मंडळाचे नावही ‘जिलब्या मारूती मंडळ’ असे आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक स्वप्नील नहार व सुप्रसाद पुराणिक यांनी दिली.
हे मंडळ सुरूवातीची १० वर्षे ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे सादर करत होते. मंडळाच्या हितचिंतक व कार्यकर्ते यांना एक कायमस्वरूपी मूर्ती असावी, असे वाटले म्हणून प्रसिद्ध मूर्तिकार कै. नागेश शिल्पी यांच्याकडून ही मूर्ती घडवली असून, त्यांनी यात गणेश यंत्र बसवले आहे.
वैशिष्ट्ये
- जिलब्या मारूती मंडळाची मूर्ती ही खूप सुंदर आणि रेखीव आहे.
- डाेळे काचेचे असल्याने मूर्तीत जिवंतपणा जाणवतो. ही मूर्ती ४० वर्षे जुनी आहे.
- गणेशमूर्तीच्या सोंडेवर नक्षीकाम करण्याची आणि मूर्तीत काचेचे डोळे बसविण्याची सुरूवात शिल्पी यांनी सुरू केली, असे सांगितले जाते.
- मंडळाने मूर्ती निर्माण केल्यानंतर वेगवेगळे महाल उभारण्यास सुरूवात केली.
- येथे दरवर्षी बाप्पांना जिलब्यांचा प्रसाद दाखविला जातो. मिरवणुकीतही मंडळाकडून जिलब्या वाटल्या जातात.