Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : पचणी न पडणाऱ्या संस्कृतीमुळे जेजुरीकरांनी भाजपला नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:10 IST2025-12-23T11:08:21+5:302025-12-23T11:10:17+5:30
- नगराध्यक्ष पदासाठी दुप्पट मतांनी जयदीप बारभाई विजयी होताच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला अधिक ठळक

Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : पचणी न पडणाऱ्या संस्कृतीमुळे जेजुरीकरांनी भाजपला नाकारले
- बी. एम. काळे
जेजुरी : जेजुरी नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीचा निकाल रविवारी (दि. २१) जाहीर झाला असून, या निकालातून जेजुरीतील राजकीय वास्तव ठळकपणे समोर आले आहे. भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले असून, जेजुरीत भाजपची मुळे रुजवणे अद्याप कठीणच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने २० पैकी तब्बल १७ जागांवर विजय मिळवत नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
एकेकाळी जेजुरीकरांचा मोठा जनाधार असलेले माजी आमदार संजय जगताप यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांचा भाजप प्रवेश जेजुरीतील मतदारांना मान्य नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. अठरापगड जाती-जमातींच्या सामाजिक सलोख्याने नांदणाऱ्या जेजुरीत भाजपची राजकीय संस्कृती रुजवणे मतदारांनी नाकारले असल्याची चर्चा आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी भाजपचे सचिन सोनवणे यांचा दुप्पट मतांनी पराभव केला. या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय अधिक ठळक केला. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सर्वपक्षीयांची भक्कम मोट बांधल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
अजित पवार गटाने दोन पावले मागे सरत शरद पवार गटातील निष्ठावंत नेते, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांचे मन वळवले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव जयदीप बारभाई यांना अजित पवार गटात प्रवेश देत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. याच टप्प्यावर जेजुरीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले. याशिवाय काँग्रेस, उबाठा शिवसेना गट आणि इतर पक्षीय संघटनांची जुळवाजुळव करण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.
सर्वपक्षीय मोट बांधताना संजय जगताप यांचेच अनेक माजी सहकारी राष्ट्रवादीकडे आले आणि त्यांना उमेदवारीही देण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र सुरुवातीला कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. उमेदवारांची निवड पक्ष नेतृत्व करणार, या भूमिकेमुळे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर होऊ शकले नाहीत. यामध्ये भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी आमदार संजय जगताप यांची कोंडी झाल्याचे चित्र दिसले.
पक्षाने जबाबदारी दिली असली तरी उमेदवार निवडीचे अधिकार नसल्याने भाजपला योग्य उमेदवार मिळवणे कठीण बनले होते. एकीकडे पक्षात प्रवेश, तर दुसरीकडे पक्ष संस्कृतीची पुरेशी जाण नसल्यामुळे भाजपला निवडणूक यशस्वीरीत्या लढवता आली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपला मिळालेल्या दोन जागा या पक्षाच्या चिन्हावर नव्हे, तर संबंधित उमेदवारांच्या वैयक्तिक प्रतिमेच्या जोरावर मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी झालेल्या पुरंदर विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार असलेल्या आणि सध्या भाजप नेते असलेल्या संजय जगताप यांना जेजुरीत सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र नगरपालिकेच्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढूनही त्यांना तितकेही मतदान मिळू शकले नाही. यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाला जेजुरीतील मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याचे चित्र दिसते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामागील निर्णायक टर्निंग पॉईंट म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जेजुरीतील सभा मानली जात आहे. सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ‘खंडोबाच्या साक्षीने जेजुरीच्या विकासाचा शब्द देतो, सत्ता द्या’ या अजित पवारांच्या विधानावर जेजुरीकरांनी दाखवलेला विश्वास राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरला.
याशिवाय विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनी जेजुरी नगरपालिका निवडणुकीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशीही चर्चा आहे. स्थानिक पातळीवरून केवळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि तीन नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करण्यात आले. लोकप्रतिनिधी असूनही पूर्ण पॅनल का उभे राहिले नाही, याबाबत मतदारांमध्ये संभ्रम होता.
तीर्थक्षेत्र असल्याने जेजुरीचे अर्थकारण पूर्णतः जेजुरी गडावर अवलंबून आहे. गडाचे व्यवस्थापन पाहणारे विश्वस्त मंडळ भाजप विचारांचे असतानाही त्याचा कोणताही राजकीय फायदा भाजपला मिळू शकला नाही, हेही या निकालातून स्पष्ट झाले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत भाजपला पक्षवाढीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. अन्यथा बहुजन समाजाच्या या भूमीत भाजप संस्कृतीला स्थान मिळणे कठीणच राहील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.