अपंगत्वावर मात करत ते साकारतायेत गणेशमूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 21:13 IST2019-08-27T21:11:42+5:302019-08-27T21:13:44+5:30
जिद्द असेल तर अशक्यही शक्य करता येऊ शकतं याचं उदाहरण पुण्याच्या संदीप नाईक यांनी घालून दिले आहे. अपंगत्वार मात करत ते गणेश मुर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत.

अपंगत्वावर मात करत ते साकारतायेत गणेशमूर्ती
पुणे : जिद्द , सकारात्मकता आणि आशादायी जीवन यांचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचे संदीप नाईक. संदीप अपंग आहेत. परंतु याची त्यांना कधीच खंत वाटली नाही. आपल्या अपंगत्वावर मात करत ते गणेशमूर्ती साकारण्याचे काम त्यांच्या भावाच्या मदतीने करत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते त्यांच्या भावाला या कामात मदत करत आहेत. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
संदीप हे पुण्यातील काेथरुड भागात राहतात. ते जन्मतःच अपंग आहेत. आपण अपंग आहाेत याचं त्यांनी कधीच दुःख केलं नाही. त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांना त्यांच्या अपंगत्वाची जाणीव हाेऊ दिली नाही. लहाणपणी चित्रकलेची आवड त्यांना जडली. याच आवडीला त्यांनी मूर्त स्वरुप दिले. त्यांचे माेठे बंधू सचिन नाईक हे गणेशाेत्सवात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. त्यांना संदीप यांनी मदत करण्यास सुरुवात केली. गणेशमूर्ती कशी असेल, तिला रंग कुठला असेल, रंगसंगती कशी असेल हे सर्व संदीप ठरवतात. सुरुवातीच्या काळात संदीप त्यांच्या भावाला मुर्ती तयार करण्यासही मदत करत असे. परंतु कालानुरुप त्यांची हाडे अधिक ठिसूळ झाल्याने त्यांच्या हालचाली आणखी मंदावल्या. सध्या संदीप यांना बसता देखील येत नाही. परंतु यावर देखील मात करत ते आता गणेशमूर्तींना रंग देण्याचे काम करतात. झाेपून का हाेईना आपण काम करायचे असाच चंग त्यांनी मनाशी बांधला आहे.
नियतीने जरी अन्याय केला असला तरी त्यांनी कलेला आपला आधार केलं. कला त्यांच्या जगण्याचं साधन बनली. हीच कला जास्तीत जास्त लाेकांपर्यंत जाण्यासाठी त्यांना गणेश मूर्ती विकण्यासाठी एका दुकानाची आवश्यकता आहे. कलेचा देव असणाऱ्या गणपतीकडे ते लाेकांना चांगले आराेग्य लाभाे अशीच प्रार्थना करतात. संदीप यांचे बंधु सचिन म्हणाले, मी गेल्या 30 वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे काम करताे. सुरुवातीला मी तयार केलेली मुर्ती संदीपला आवडली. नंतर मी त्याला देखील मुर्ती तयार करण्यास शिकवले. ताे नवनवीन कल्पना देत असताे, त्याप्रमाणे आम्ही मूर्ती तयार करत असताे. त्याला आम्ही ताे अपंग आहे असे कधी जाणवू दिले नाही. या कलेमुळे ताे कामात रमू लागला. त्यातून त्याला पैसेही मिळू लागले. त्याला अवगत झालेल्या कलेमुळे ताे आनंदी जीवन जगताेय. या कलेत ताे चांगलाच रमला आहे. गणेश मूर्तीमध्ये नावीन्य आलं पाहिजे असा त्याचा नेहमीच हट्ट असताे.