एकाला हार्ट अटॅक; तिघे उंचावरून पडले, १६ जणांना चक्कर; पुण्यात विसर्जनाला १०८ नागरिकांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 14:38 IST2022-09-11T14:36:52+5:302022-09-11T14:38:02+5:30
मिरवणुकीदरम्यान डायल १०८ ने दिली १०८ जणांना सेवा

एकाला हार्ट अटॅक; तिघे उंचावरून पडले, १६ जणांना चक्कर; पुण्यात विसर्जनाला १०८ नागरिकांवर उपचार
पुणे : डायल १०८ ने पुणे शहर व जिल्ह्यातील नारायणगाव येथे मिळून मिरवणुकीदरम्यान एकूण १०८ रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली. यापैकी ८४ जणांवर जागेवरच उपचार देण्यात आले, तर २४ जणांना मात्र, रुग्णालयात हलवावे लागले, अशी माहिती डायल १०८ चे जिल्हा व्यवस्थापक डाॅ. प्रियांक जावळे यांनी दिली. मिरवणुकीदरम्यान शहरात अलका टाॅकी, बेलबाग चाैकी, शिवाजीनगर, मंडई, ओंकारेश्वर, शनिवार वाडा, तुळशीबाग, नारायणगाव ग्रामीण रुग्णालय अशा १४ ठिकाणी १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या हाेत्या. त्यांनी मिरवणुकीदरम्यान ही सेवा दिली.
एकाला हृदयविकाराचा धक्का, तर पाच जणांचा अपघात
या १०८ रुग्णांपैकी विजय टाॅकीज येथे एका रुग्णाला हृदयविकाराचा धक्का आला हाेता, तर पाच जणांचा किरकाेळ अपघात झाला हाेता. ३ जण मिरवणूक पाहताना उंचावरून पडले हाेते. तसेच चक्कर येणे व इतर प्रकारची सेवा देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १६ हाेती. इतर प्रकारचे १६ तर पाॅलिट्राॅमा म्हणजे जखमी हाेऊन विविध हाड फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांची संख्या १४ हाेती. झेड ब्रिजच्या खाली ट्रक्टरवरून इतरांच्या अंगावर एकजण खाली पडला. त्यावेळी पाच जण जखमी झाले, अशीही माहिती १०८ कडून देण्यात आली.
केळकर रस्त्यावरून मागे फिरण्याची वेळ
शुक्रवारी मध्यरात्री टिळक चाैकातून एक १०८ ॲम्ब्युलन्स रुग्णाला घेऊन केळकर रस्त्याने शनिवारवाड्याच्या दिशेने निघाली; परंतु रस्त्यावरील डीजेच्या दणदणाटात गुंग असलेल्या असंवेदनशील मंडळांनी रुग्णवाहिकेला जायला जागा न दिल्याने माघारी फिरावे लागले.