गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही...! पुणे महापालिकेचे आदेश
By निलेश राऊत | Updated: September 15, 2022 13:34 IST2022-09-15T13:34:26+5:302022-09-15T13:34:34+5:30
गणेशोत्सव संपून पाच दिवस झाले तरीही अनेक मंडळांचे मांडव, देखाव्यांचे साहित्य, सांगाडे, रथ, कमानी रस्त्यावर अथवा पदपथावर पडून

गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही...! पुणे महापालिकेचे आदेश
पुणे : गणेशोत्सव संपून पाच दिवस उलटले तरी, रस्त्यांवरील गणेश मंडप, विसर्जन रथ, रनिंग मांडव हटविण्यात आलेले नाहीत. ते आजच्या आजच हटविण्यात यावेत, असे आदेश महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिले आहेत.
शहरातील जी गणेश मंडळ कार्यवाही करणार नाहीत व रस्ते, पादचारी मार्ग तातडीने मोकळे करणार नाहीत, त्यांना पुढील वर्षी गणेशोत्सवास परवानी देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयांनी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी आदेशात नमूद केले आहे.
कोरोना आपत्तीमुळे दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला नव्हता. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव पार पडला असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने तसेच पोलिसांनाही मंडळांकडून आकारले जाणारे परवाना शुल्क माफ केले आहे. याचबरोबर गणेश मंडळांना २०२७ पर्यंत पाच वर्षाचा एकत्रित परवाना देण्यात आला आहे. गणेशोत्सव संपून पाच दिवस झाले तरीही अनेक मंडळांचे मांडव, देखाव्यांचे साहित्य, सांगाडे, रथ, कमानी रस्त्यावर अथवा पदपथावर पडून आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.