Chakan Nagar Parishad Election Result 2025 : चाकण नगरपरिषदेत सत्तास्थापनाच्या हालचालींना वेग, उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:21 IST2025-12-30T16:19:18+5:302025-12-30T16:21:06+5:30

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत.

Chakan Nagar Parishad Election Result 2025 Power formation moves accelerate in Chakan Nagar Parishad, political play in color for the post of Deputy Mayor | Chakan Nagar Parishad Election Result 2025 : चाकण नगरपरिषदेत सत्तास्थापनाच्या हालचालींना वेग, उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात

Chakan Nagar Parishad Election Result 2025 : चाकण नगरपरिषदेत सत्तास्थापनाच्या हालचालींना वेग, उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय खेळी रंगात

चाकण: बहुचर्चित चाकण नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर आता सत्तास्थापन, उपनगराध्यक्षपद तसेच विविध अंतर्गत समित्यांच्या अध्यक्षपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांकडून पदांसाठी फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, पदवाटप करताना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार असल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० नगरसेवक विजयी झाले आहेत. शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असून, निवडून आलेल्या एकमेव अपक्ष नगरसेवकानेही शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी शिंदे गटाच्याच नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या एका नगरसेवकाच्या भावाला उपनगराध्यक्षपदी बसवण्यासाठी संबंधित नेत्याने वरिष्ठ पातळीवर जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा शहरात सुरू आहे. जातीय समीकरणे आणि राजकीय बेरजेनुसार बहुजन समाजातील एखाद्या नगरसेवकाला उपनगराध्यक्षपद मिळू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. स्पष्ट बहुमतामुळे घोडेबाजाराला मर्यादा येतील, असेही बोलले जात आहे.

याच दरम्यान, दुसऱ्या पक्षातील एका नगरसेवकाने ‘सहा नगरसेवक सोबत घेऊन येतो, उपनगराध्यक्ष पद द्या,’ असा प्रस्ताव शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वीकृत सदस्यपदासाठीही काही कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून या जागेचा ‘शब्द’ देण्यात आला होता, असा दावा काही इच्छुकांकडून केला जात असून, त्यामुळे आपल्यालाच संधी मिळणार असल्याचा प्रचार शहरात सुरू आहे.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे १०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा शहरात आहे. निवडणूक काळात एका मतासाठी दहा ते वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आल्याच्या चर्चा आपसात होत आहेत. विशेष म्हणजे एका उमेदवाराला अवघ्या २० मतांनी पराभव स्वीकारावा लागला असून, मागील पंचवार्षिक निवडणुकीतही त्याच उमेदवाराला असाच अनुभव आल्याने त्याची शहरात जोरदार चर्चा आहे.

मतमोजणीदरम्यान माध्यम प्रतिनिधींना पुरेशी माहिती दिली जात नसल्याची तक्रार होती. त्यातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २०२५ मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकाला २०१५ सालचा शिक्का असलेले विजय प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या गंभीर चुकीमुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र टीका होत आहे.

या निवडणुकीत उद्धव सेनेला केवळ एकच जागा मिळाल्याने काही दिवसांपूर्वी ‘शिवसेनेचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्ये उद्धवसेनेची पिछेहाट स्पष्ट झाली आहे. याउलट शिंदे गटाचे प्राबल्य ठळकपणे दिसून आले आहे. राज्यभर चर्चेत असलेली उद्धवसेना–शिंदेसेना युती या निवडणुकीत असली, तरी त्याचा फायदा प्रामुख्याने शिंदे गटालाच झाल्याची चर्चा आहे. 

एकच अपक्ष विजयी

राज्यात अनेक ठिकाणी आघाडीवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मात्र या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, हे विशेष मानले जात आहे. मात्र पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. एबी फॉर्म देताना अनेक इच्छुक उमेदवारांची समज काढावी लागल्याने उमेदवारी प्रक्रियेतही मोठी धांदल उडाली होती. या सगळ्यात केवळ एकच अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने त्याचाही विशेष उल्लेख केला जात आहे. 

राजकारण तापले

एकूणच निवडणूक संपल्यानंतरही सत्तास्थापन, पदवाटप आणि राजकीय समीकरणांमुळे चाकणचे राजकारण तापलेलेच असून, पुढील काही दिवसांत कोणाच्या गळ्यात कोणते पद पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : चाकन नगर परिषद: चुनाव के बाद सत्ता संघर्ष तेज, उपाध्यक्ष पद की दौड़ शुरू।

Web Summary : चाकन नगर परिषद चुनाव के बाद सत्ता के लिए राजनीतिक जोड़तोड़ तेज हो गया है। शिंदे गुट के बहुमत के साथ, उपाध्यक्ष पद की दौड़ तेज हो गई है। चुनाव के दौरान वित्तीय अनियमितताओं पर भी चर्चा हो रही है।

Web Title : Chakan Nagar Parishad: Power struggle intensifies post-election, VP race heats up.

Web Summary : Chakan witnesses political maneuvering for power after Nagar Parishad elections. With Shinde's group holding majority, the race for Deputy Mayor intensifies. Negotiations and strategic alliances are underway, while financial irregularities during the election are also being discussed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.