दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 21:14 IST2021-09-14T21:14:07+5:302021-09-14T21:14:22+5:30
माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारा देखावा गौरी गणेशा समोर साकारला आहे

दौंडमध्ये तृतीयपंथींच्या वाड्यात गौराईबरोबरच बाप्पा 'निसर्गाच्या सानिध्यात' विराजमान
यवत : माणसाच्या आयुष्यात निसर्गातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि यासाठी माणसाने निसर्गाची जोपासना करावी असा संदेश देणारा देखावा यवत येथील तृतीयपंथी वाड्यात गौरी गणेशा समोर साकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र विविध नियमांसह गौरी गणेश उत्सव साजरा केला जात आहे. यवत मधील तृतीयपंथी वाड्यात साजरा होणारा गौरी गणपती उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.
यवत (ता.दौंड) येथील तृतीयपंथी वाड्यात दीपा गुरू रंजिता नायक यांनी गौरीगणपती उत्सव सुरू करून त्यामधून सामाजिक संदेश देण्याचा केलेला प्रयत्न हा संपूर्ण यवत पंचक्रोशीतील गावांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांचा येथे वाडा आहे. तृतीयपंथी बदलले तरी येथे येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांच्या प्रमुखाने गावातील सर्व नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. यामुळे इतरत्र सर्वत्र उपेक्षित म्हणून गणले जाणारे तृतीयपंथीय यवतमध्ये मात्र, सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांना नेहमी आदराची वागणूक गावात मिळत असते.
गौरी गणपती उत्सव सुरू केल्यानंतर त्यांच्या आदरात आणखी भर पडली आहे. त्यांनी गौरी गणपतीला केलेली सजावट पाहण्यासाठी केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील महिला व नागरिक काल मोठ्या प्रमाणावर आले होते. गौरी गणपतीला त्यांनी केवळ आकर्षक सजावट व देखावा न करता सामाजिक संदेश देण्यासाठी सर्वधर्म समभाव, मुलगी वाचवा मुलगी शिकवा यासारखे संदेश त्यांनी मागील काही वर्षात साकारले आहेत.
मुंबई मधील सेलिब्रिटीस पासून ते नागपूर मधील गडकरी वाड्यात साजरा केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवाची प्रसिद्धी सर्वच प्रसिद्धी माध्यमांमधून होत असते. मात्र, पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये तृतीयपंथी वाड्यात साजरा केला जाणार गौरी गणपती उत्सव मात्र अद्याप पर्यंत यापासून उपेक्षित होता. मात्र मागील काही वर्षांत विशेष प्रसिद्ध झाला आहे.