Alandi Nagar Parishad Election Result 2025 :'विकास आराखड्या'ला पसंती; पवारांच्या दाव्याला मतदारांनी नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 10:34 IST2025-12-24T10:31:53+5:302025-12-24T10:34:15+5:30
हा निकाल केवळ एका पक्षाचा विजय नसून, मतदारांनी विकासाच्या ठोस आश्वासनांना दिलेली स्पष्ट पसंती मानली जात आहे.

Alandi Nagar Parishad Election Result 2025 :'विकास आराखड्या'ला पसंती; पवारांच्या दाव्याला मतदारांनी नाकारले
आळंदी : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी (अजित पवार)चे वर्चस्व सर्वश्रुत असताना, तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या निकालाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा केवळ पराभवच केला नाही, तर त्यांचा अक्षरशः धुव्वा उडवत नगर परिषदेत एकहाती सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे यांनी तब्बल ६ हजार ६९० मतांनी दणदणीत विजय मिळवला. हा निकाल केवळ एका पक्षाचा विजय नसून, मतदारांनी विकासाच्या ठोस आश्वासनांना दिलेली स्पष्ट पसंती मानली जात आहे.
या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिलेले शब्द निर्णायक ठरल्याचे चित्र आहे. ‘आळंदीचा चेहरामोहरा बदलू’, असे ठाम आश्वासन देत ‘संतपीठ’, ‘निर्मल इंद्रायणी’ आणि सुधारित पाणीपुरवठा योजना यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा फडणवीस यांनी केली होती. ही आश्वासनेच मतदारांच्या मनात घर करून गेल्याचे निकालातून स्पष्ट होते. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री या नात्याने विकासाची सूत्रे आपल्याकडे असल्याचे सांगितले होते; मात्र आळंदीकरांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर अधिक विश्वास दाखवल्याचे दिसून आले.
पक्षनिहाय बलाबल पाहता, भाजपने २०१७ च्या तुलनेत आपली ताकद लक्षणीयरीत्या वाढवली आहे. मागील निवडणुकीत ११ जागांवर असलेला भाजप यंदा १५ जागांवर पोहोचला आहे. महायुतीतील शिंदेसेनाने ४ जागा जिंकून आपली उपस्थिती राखली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. हा निकाल राष्ट्रवादीसाठी अंतर्मुख करणारा ठरत आहे. उद्धवसेना आणि काँग्रेसला खातेही उघडता न आल्याने विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नगराध्यक्ष पदाची लढत जरी चौरंगी भासत असली, तरी प्रत्यक्षात ती भाजप व राष्ट्रवादी यांच्यातच सीमित राहिली. दोन अपक्ष उमेदवारांना मिळून अवघी २१० मते मिळाली, तर ‘नोटा’ला १९७ मते मिळाली. यावरून आळंदीकरांनी विखुरलेल्या मतदानाऐवजी स्पष्ट कौल देण्यावर भर दिल्याचे दिसते.
एकूणच, उपजिल्हा रुग्णालय, बहुमजली पार्किंग, नवीन एसटी स्टँड यांसारख्या प्रलंबित विकासकामांच्या अपेक्षेने आळंदीकरांनी भाजपच्या झोळीत भरभरून दान टाकले आहे. आता दिलेला शब्द पाळून शहराचा कायापालट करण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे.
विशेष घडामोडी
-प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेचे आदित्यराजे घुंडरे व ऋतुजा घुंडरे हे पती–पत्नी विजयी.
-माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्या पत्नी ज्योती चिताळकर, शिंदेसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या पत्नी संगीता चव्हाण, तसेच भाजपचे माजी गटनेते पांडुरंग वहिले यांचा पराभव.
-माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर सर्वाधिक १,८६२ मतांनी नगरसेवकपदी विजयी.
-खुशी बोरुंदिया (वय २२) ठरल्या सर्वात तरुण नगरसेविका.
-माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व दिनेश घुले विजयी.