पुण्यातील ३ प्रभागांत २० हजार मतदारांची 'नोटा'ला पसंती; आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:34 IST2026-01-19T13:34:50+5:302026-01-19T13:34:58+5:30
निवडणूक लढवणाऱ्या ८३ उमेदवारांपैकी एकाही उमेदवारावर विश्वास न टाकता १९ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘नोटा’ला पसंती देणे ही आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर आहे

पुण्यातील ३ प्रभागांत २० हजार मतदारांची 'नोटा'ला पसंती; आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर
धनकवडी : पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांइतकेच ‘नोटा’ म्हणजेच (वरीलपैकी कोणीही नाही) या पर्यायाने लक्ष वेधून घेतले. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पद्मावती सहकारनगर प्रभाग क्रमांक ३६, धनकवडी कात्रज डेअरी प्रभाग क्रमांक ३७ व बालाजीनगर कात्रज आंबेगाव प्रभाग क्रमांक ३८ या तीन प्रभागांमध्ये ८३ उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरले होते. एकूण मतदारसंख्या ३,०३,५३९ इतकी असताना, केवळ ५३.२१ टक्के मतदान झाले. म्हणजेच, १ लाख ६० हजार ५७१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानात ‘नोटा’ला तब्बल १९ हजार ३०० मते मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकशाही व्यवस्थेत ‘नोटा’ हा पर्याय केवळ एक तांत्रिक सुविधा नसून मतदारांच्या असंतोषाचा थेट आवाज मानला जातो. दक्षिण उपनगरासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला न पसंत करता ‘नोटा’ची निवड करणे, ही बाब राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरली आहे. निवडणूक लढवणाऱ्या ८३ उमेदवारांपैकी एकाही उमेदवारावर विश्वास न टाकता १९ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘नोटा’ला पसंती देणे ही आकडेवारी मोठी असून, त्यामागचा संदेश अतिशय गंभीर आहे.
धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागांपैकी ३८ हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग आणि पाच सदस्यीय प्रभाग होता. या ठिकाणी चौरंगी लढत आणि प्रमुख पक्षांमध्ये तीव्र लढत दिसून आली. अनेक प्रभागांत नवनिर्वाचित नगरसेवक, नातेवाइकांतील राजकीय संघर्ष, तर अपक्ष उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली. मात्र, या सर्व राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर ‘नोटा’कडे वळलेले मतदान हे मतदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचे मानले जात आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पारदर्शक कारभार आणि विश्वासार्ह नेतृत्व या मुद्द्यांवर उमेदवार अपयशी ठरल्याची भावना या मतदानातून व्यक्त होत असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी व्यक्त केले आहे.
तीन प्रभागनिहाय नोटाची आकडेवारी
प्रभाग - ३६ - ४४,२६४ एकूण मतदान - ५,१८८ नोटा
प्रभाग - ३७ - ३७,४२७ एकूण मतदान - ५,१८१ नोटा
प्रभाग - ३८ - ७९,८२६ एकूण मतदान - ८,९३१ नोटा