विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 18:17 IST2019-09-12T18:11:36+5:302019-09-12T18:17:51+5:30
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवडकर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी येत आहेत.....

विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप
चिंचवड : ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा गजर आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...." असा जयघोष करीत चिंचवड परिसरात घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
चिंचवड मधील पवना नदी घाटावर सकाळ पासून गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवड कर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी येत आहेत.
चिंचवड मधील थेरगाव घाट, मोरया समाधी मंदिर घाट व काकडेपार्क येथील घाटावर सकाळी सात वाजल्यापासून घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू आहे. सकाळपासून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी गणेशभक्तांच्या आनंदात भर टाकत आहे.
घाट परिसरात निर्माल्यदान व मूतीर्दान करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते सज्ज आहेत.पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस मित्र संघटना, शांतता कमिटी व अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीला उभे आहेत.
महापालिकेचा अग्निशमन दल, वैदकीय विभाग, आरोग्य कर्मचारी घाटावर सेवा देत आहेत. महापालिका प्रशासनाने निर्माल्य कुंड, प्रदूषण टाळावे यासाठी स्वतंत्र पाण्याचे कुंड तयार केलेले आहेत. सोहळ्यावर सिसिटीव्ही ची नजर आहे.
संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने घाटावर मूर्ती दान उपक्रम राबविला जात आहे.या उपक्रमाला भाविक चांगला प्रतिसाद देत आहेत. महापालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित आहेत.