निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 20:01 IST2026-01-05T20:00:48+5:302026-01-05T20:01:10+5:30
प्राथमिकदृष्ट्या या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिले.

निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत झालेल्या एका गंभीर प्रशासकीय चुकीचा फटका थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बसला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)च्या उमेदवाराचा एबी फॉर्म गहाळ झाल्याच्या प्रकरणात ब प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडून कामकाज काढले आहे.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जयश्री भोंडवे यांनी प्रभाग १६ मधून ओबीसी महिला आरक्षणांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्जासोबत त्यांनी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ही जोडला होता. मात्र छाननी प्रक्रियेदरम्यान हा एबी फॉर्म गहाळ झाल्याचे कारण पुढे करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयश्री भोंडवे यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या निर्णयाविरोधात जयश्री भोंडवे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म सादर केल्याचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी तसेच अन्य तांत्रिक पुरावे सादर केले. प्राथमिकदृष्ट्या या पुराव्यांमध्ये तथ्य आढळल्याने न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सुनावणी घेऊन सर्व बाबींची तपासणी करण्याचे आदेश दिले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाई
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे. ब प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी हणमंत पाटील यांच्याकडील कामकाज काढून घेण्यात आले असून त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एबी फॉर्म गहाळ होण्याच्या प्रकारामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान जयश्री भोंडवे यांनी एबी फॉर्म वेळेत सादर केला होता, हे स्पष्ट झाले. सादर करण्यात आलेले पुरावे आणि तांत्रिक नोंदी तपासल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी हा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवे यांना प्रत्यक्ष चिन्ह वाटपाच्या यादीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह देण्यात आल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कामकाज काढून घेण्यात आले आहे - श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महापालिका