PCMC Elections 2026: ‘होम पीच’वर कसोटी..! आमदार आणि खासदारांच्या प्रभागात गुलाल कोणाचा ?
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 9, 2026 12:57 IST2026-01-09T12:48:58+5:302026-01-09T12:57:52+5:30
दिग्गजांची अग्निपरीक्षा : ; विरोधकांनी उभे केले आव्हान; युती, विरोधक आणि अपक्षांमुळे समीकरणे गुंतागुंतीची; लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष

PCMC Elections 2026: ‘होम पीच’वर कसोटी..! आमदार आणि खासदारांच्या प्रभागात गुलाल कोणाचा ?
पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. शहरातील खासदार आणि आमदार ज्या प्रभागात राहत आहेत, त्या प्रभागांतही वातावरण तापले आहे. ‘होम पीच’वर या नेत्यांचा प्रभाव सर्वाधिक असतो. त्या प्रभागातच यंदा थेट दुरंगी टक्कर, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. अपक्षांची वाढती ताकदही दिसून येत आहे. त्यामुळे हे प्रभाग प्रतिष्ठेचे ठरत आहेत. तेथे गुलाल कोणाला लागणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
खासदारांच्या प्रभागात शिवसेना विरुद्ध अपक्ष
खासदार श्रीरंग बारणे राहतात, त्या प्रभाग क्रमांक २४ (थेरगाव, डांगे चौक, गणेशनगर) मध्ये शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती आहे. मात्र, भाजपने येथे कमळ चिन्हावर एकच उमेदवार दिला आहे, तर तीन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने ते अपक्ष आहेत. त्यातच इतर अपक्षही ताकदीचे असल्याने मतविभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अण्णा बनसोडेंच्या प्रभागात भाजप आक्रमक
विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या घरच्या प्रभाग क्रमांक १४ (आकुर्डी गावठाण, काळभोरनगर) मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. हा प्रभाग मागच्या निवडणुकीत शिवसेनेने काबीज केला होता. त्यापैकी काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या आक्रमक हालचालींमुळे सामना चुरशीचा बनला आहे. बनसोडे यांचा मुलगा मात्र प्रभाग ९ मध्ये उभा आहे.
महेश लांडगे, शंकर जगतापांच्या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे आव्हान
भाजपचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या घरच्या प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी, पिंपळे गुरव, साई चौक) मध्येही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) असा सामना होत आहे. विकासकामांचा मुद्दा आणि संघटनात्मक ताकद यावर निकाल ठरणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘होम पीच’वर प्रभाग क्रमांक ७ (भोसरी गावठाण, शीतलबाग) येथेही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) अशीच थेट झुंज आहे.
उमा खापरे, अमित गोरखेंच्या प्रभागांत मतविभाजन
विधानपरिषदेतील भाजपच्या आमदार उमा खापरे यांच्या प्रभाग क्रमांक १९ (भोईर कॉलनी, पिंपरी कॅम्प, भाटनगर) मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे. मिश्र लोकसंख्या आणि स्थानिक प्रश्नांमुळे येथे राजकीय वातावरण बदलत आहे. विधानपरिषदेतील भाजपचेच आमदार अमित गोरखे यांच्या घरच्या प्रभाग क्रमांक १३ (यमुनानगर, ओटास्कीम, निगडी)मध्ये मात्र भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी (अजित पवार) अशी तिरंगी लढत होणार आहे. मतांचे विभाजन येथे निर्णायक ठरणार आहे.